जिल्ह्यात लसीकरणासाठी आघाडीवरील ३० हजार वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आहेत. १३ हजार लिटर लस साठवणुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात १०० दिवसांत लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. करोना काळात कार्यरत आशा, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचा परतावा तातडीने देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रविवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना आणि पर्यटन विकास आढावा बैठक पार पडली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात जवळपास पाच हजार रुग्ण आढळले. आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील. त्या अनुषंगाने विभाग, जिल्ह्यातील पदांच्या मागणीचे नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले. संभाव्य दुसरी लाट लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. प्राणवायूचा नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे त्याची कमतरता भासणार नाही. ब्रिटनमधून येणाऱ्या पाहुण्यांचे आपण विलगीकरण करत आहोत.

नाशिकमध्ये तसे प्रवासी असतील तर त्याबाबत काटेकोरपणे काळजी घ्यावी. ग्रामीण रुग्णालयात प्राणवायूची व्यवस्था करावी. धोंडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम लवकर सुरू करावे, असे त्यांनी सूचित केले. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात नाशिक परिक्षेत्रात विशेष मोहीम राबविली गेली. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना १२ कोटी रुपये परत मिळाले. पोलिसांनी वेळीच हिसका दाखविल्याने शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘पर्यटन स्थळांचा पर्यावरणस्नेही विकास करा’

तोरळमाळ, सारंगखेडा, शिर्डी आदीं पर्यटन स्थळांचा पर्यावरणस्नेही पध्दतीने विकास करण्यासाठी नियोजन करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. करोनामुळे घरात थांबून नागरिक कंटाळले आहेत. बोट क्लबसह इतर ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.

त्यांना विरंगुळा म्हणून भटकंती करू द्यावी. बोट क्लबवर सुरक्षा महत्वाची असून त्याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले. पर्यटनस्थळी वीज बचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर, भंडारदरा धरणावर जल क्रीडा संदर्भात विचार विनिमय करण्याची सूचनाही त्यांनी केली.