राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. हे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून माध्यमांसमोर भूमिका मांडणाऱ्या काही प्रमुख नेतेमंडळींमध्ये अब्दुल सत्तार यांचा समावेश होता. शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यावरून वाद देखील झाला. टीईटी घोटाळ्याच्या संदर्भात त्यांचं नाव घेतलं जात असल्यामुळे त्यावरून टीका झाली होती. पहिल्या खातेवाटपामध्ये कृषीमंत्रीपद अब्दुल सत्तार यांना दिल्यानंतर त्यावरून देखील जोरदार चर्चा रंगली होती. आता विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीपदावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“..तर याची किंमत राज्यातल्या गावांना मोजावी लागेल”

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीवर चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. “आज १८ ऑगस्टला धरणं पूर्ण भरली आहेत. मोठा पाऊस आला, तर पाणी वाहून जाण्यासाठी धरणातलं पाणी, पाणलोट क्षेत्रातलं पाणी एकत्र होईल, तेव्हा नदीकाठच्या सर्व गावांना, शहरांना धोका निर्माण होईल. त्यामुळे रात्रीच्या वेळी धरणावर अधिकारी असलेच पाहिजेत. पाऊस सुरू झाला आणि धरणावर दरवाजे कमी-अधिक उघडण्यात खालच्या अधिकाऱ्यांनी काही चूक केली, तर त्याची किंमत महाराष्ट्रातल्या खालच्या भागातल्या गावांना मोजावी लागेल”, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

“मुख्यमंत्री महोदय..हे वागणं बरं नव्हं, आपल्याला पुन्हा एकत्र…”; विधानसभेत अजित पवारांची टोलेबाजी!

दरम्यान, यावेळी राज्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानावर बोलताना अजित पवारांनी अब्दुल सत्तार यांच्याकडे गेलेल्या कृषीमंत्रिपदावरून खोचक टोला लगावला. “अब्दुल सत्तार, तुमच्याकडे कृषी मंत्रालय आलंय. त्यामुळे मी तर आश्चर्यचकितच झालो. दादा भुसे फार बारकाईने बघत होते. का त्यांच्यावर अन्याय केला गेला मला माहिती नाही. मी तेव्हा बघायचो की दादा भुसे खरंच काम चांगलं करत होते. जे चांगलंय, त्याला मी चांगलंच म्हणणार”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“४० आमदारांसाठी वेगळं ऑफिसच उघडलंय”

अजित पवार अतिवृष्टीवर भाषण करताना समोरच्या बाकावरून शिंदे गटातील काही आमदार बसून बोलत होते. यावरून अजित पवारांनी त्यांना देखील टोला लगावला. “थांबा, तुम्ही ४० आमदार कुठं जाणार नाहीत. तुमचीच कामं करणार आहेत. जरा गप्प बसा. एक दिवस तरी विरोधी पक्षाचं ऐकू द्या. तुमच्यासाठी तर तिकडे खास वेगळं ऑफिसच उघडलं आहे. काळजीच करू नका. तुम्हाला ४० लोकांना तर फार सांभाळायचं आहे”, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला!

“महाराष्ट्र संकटात असताना तुमचे लोक…”, अतिवृष्टीवर बोलताना अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर आगपाखड!

त्यावर विरोधी बाकांवरून ते ४० नसून ५० आमदार असल्याचा उल्लेख करताच “नाही ४०.. ते वरचे १० असेतसेच आहेत”, असं अजित पवारांनी म्हटल्यानंतर पुन्हा एकदा हशा पिकला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar mocks abdul sattar on agriculture ministry on monsoon session pmw
First published on: 18-08-2022 at 18:11 IST