scorecardresearch

गोपीचंद पडळकरांचा देवेंद्र फडणवीसांना फोन; अजित पवार म्हणतात, “आम्ही फोन करतो तर…”!

अजित पवार म्हणतात, “आम्हीही कधीकधी कुणाला फोन करतो तर आमचा सकाळी लावलेला फोन…!”

ajit pawar gopichand padalkar devendra fadnavis
अजित पवारांचा पडळकरांना खोचक टोला! (फोटो – संग्रहीत छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. बदललेली परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करावी, अशी मागणी करत एमपीएससी परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मागणी मान्य करत त्यासंदर्भात एमपीएससीला बदललेली पद्धती २०२५ पासून लागू करण्यात यावी, असं पत्र लिहिलं. मात्र, त्यानंतर आज पुन्हा एकदा एमपीएससी परीक्षार्थींच्या दुसऱ्या गटानं आंदोलन केलं असून ही पद्धती लगेच लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न सध्या बुचकळ्यात टाकणारा ठरला असताना त्यावरून सुरू असलेलं राजकारण रंगात आलं आहे!

दोन दिवसांपूर्वी एमपीएससी परीक्षार्थींसोबत आंदोलनात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरही दिसून आले. त्यांनी तिथूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन लावल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. या फोन कॉलमध्ये गोपीचंद पडळकरांनी एमपीएससी परीक्षार्थींचं म्हणणं फडणवीसांपर्यंत पोहोचवलं. मात्र, यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी सुरू झाली आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना आणि गोपीचंद पडळकरांना टोला लगावला आहे.

राजकीय जीवनात कोणत्या चुका केल्या? अजित पवार म्हणतात, “एक मोठी चूक वाटते की २००४ मध्ये…!”

“सरकार कुणाचं हे पाहून आंदोलनं होतात”

काही आंदोलनं सरकार कुणाचं हे पाहून केली जातात, असं अजित पवार म्हणाले. मीडियाशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. “जोपर्यंत आंदोलनकर्त्यांना न्याय मिळत नाही असं वाटतंय, तोपर्यंत ते आंदोलन करत राहणार. तो त्यांचा हक्क आहे. त्या आंदोलनात जर तथ्य असेल तर राज्यकर्त्यांनी त्यात लक्ष घालून मार्ग काढला पाहिजे. पण काही आंदोलनं ही सरकार कुणाचं आहे, ते बघून केली जातात. आंदोलन प्रमुखांच्या विचारांचं सरकार आलं की आंदोलनं होत नाहीत. एसटीचं आंदोलन आता एकदमच थांबलेलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“नौटंकीचा प्रयत्न”

दरम्यान, एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीसांना फोन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव न घेता अजित पवारांनी त्यावरून टोला लगावला. “काही लोक राजकारणात काम करत असताना जाहिरातबाजी, नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात”, असं ते म्हणाले.

“मी मुख्यमंत्री झालो तर दाखवतो काय करायचं ते”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “आत्याबाईला मिशा…”!

“निरोप देतात की फोन करू, पण…”

“वास्तविक काहीजण आंदोलनाच्या ठिकाणी जातात, त्याच दिवशी कॅबिनेट कशी असते. त्याच दिवशी फोन लावल्या लावल्या फोन लागतो. लगेच संभाषण होतं. लगेच तिथून प्रतिसाद दिला जातो की आम्ही ते काम पूर्ण करू. वास्तविक या संस्थांना (एमपीएससी) स्वायत्तता दिली आहे. त्यांना विनंती केली जाऊ शकते. पण त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही. आम्हीही कधीकधी कुणाला फोन करतो तर आमचा सकाळी लावलेला फोन संध्याकाळी लागतो. ‘कामात आहेत. कामातून मोकळे झाल्यावर त्यांना तुमचा निरोप दिला जाईल आणि तुम्हाला फोन केला जाईल’ असा निरोप दिला जातो. पण नंतर आम्हाला कधी त्यांनी फोन केला आहे असं कधी झाल्याचं आठवत नाही”, अशा शब्दांत अजित पवारांनी टोला लगावला आहे.

हे ठरवून केलंय का? असा प्रश्न विचारताच अजित पवारांनी खोचक टिप्पणी केली. “सेटची परीक्षा वेगळी आणि हे सेट केलेलं वेगळं”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 18:05 IST