मुंबई : अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीतील नेतृत्वाचा संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. विशेषतः पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरू झाल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यावर २८ जानेवारी ते १० मार्चपर्यंतचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असे पत्र त्यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले होते. तेव्हा हा वाद विकोपास गेला. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीच्या वेळी पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नवी दिल्लीत असूनही दूर राहिले. पटेल- तटकरे विरुद्ध पवार कुटुंबीयांतील वाद विकोपास गेल्याचे वास्तव समोर आले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी पटेल व तटकरे यांची प्रशंसा करणारे पत्रक काढले असले, तरी त्यातून जायचा तो संदेश गेला होता.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवी दिल्लीस्थित नरेश अरोरा यांच्या ‘डिझाइन बाॅक्स’ या कंपनीकडे प्रसिद्धीचे काम देण्यात आले होते. अरोरा यांच्या सल्ल्याने अजित पवारांनी गुबाली रंगाचे जाकीट परिधान करण्यास सुरुवात केली. तसेच प्रचार यंत्रणा राबविण्यात अरोरा यांची भूमिका महत्त्वाची होती. पक्षात अरोरा यांचे महत्त्व वाढले होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दोन दिवस आधी पोलिसांनी अरोरा यांच्या पुण्यातील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावरून अजित पवारांनीही नापसंती व्यक्त केली होती.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर प्रफुल्ल पटेल यांची पक्षाध्यक्षपदी तर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करावी, असा प्रस्ताव या अरोरा यांनी दिला होता. त्यावरून पक्षात धुसफूस वाढली. अलीकडेच अरोरा यांच्याकडे सोपविण्यात आलेले प्रसिद्धीचे काम काढून घेण्यात आले. प्रफुल्ल पटेल व पार्थ पवार यांच्यातील वादातूनच अरोरा यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ज्येष्ठांची नाराजी
पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत पार्थ पवार यांचे वाढते प्रस्थ पक्षातील जुन्याजाणत्या मंडळींना खुपू लागले. विधान परिषद निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना पार्थ यांनी पुण्यातील एका उद्योगपतीच्या मुलाच्या नावाचा आग्रह धरला होता. पण त्या नावाला प्रस्थापित मंडळींकडून विरोध करण्यात आला, असे सांगण्यात येते. शेवटी माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली. प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्या जिल्ह्यांमधील पक्षाच्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावरील फलकांवर अजित पवार व सुनेत्रा पवार यांची छायाचित्रे नसणे ही बाबही लक्षणीय ठरली आहे.
