अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यात वर्चस्व सिद्ध करण्यावरून दोन्ही पक्ष हातघाईवर आले आहेत.

जिल्ह्यात दहा नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. यात अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, श्रीवर्धन, महाड, पेण, उरण, खोपोली, कर्जत आणि माथेरान नगरपालिकांचा समावेश आहे. दहा नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी ३४, तर नगरसेवकपदासाठी ५७५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीमधील घटक पक्षच एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दहापैकी अलिबागचा अपवाद सोडला तर एकाही नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊ शकलेली नाही. उलट बहुतेक ठिकाणी दोन्ही पक्ष सोयीस्कर युत्या करून एकमेकांविरोधात निवडणुकीत उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना शिंदे गटाची चौफेर कोंडी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे संतापलेले शिवसेनेचे तिन्ही आमदार खासदार सुनील तटकरेंविरोधात कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

निवडणुकीच्या प्रचारातून स्थानिक मुद्दे दूर फेकले गेले आहेत. एकमेकांची उणीदुणी काढण्यावर दोन्ही पक्षांकडून भर दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे एकमेकांचे पक्ष फोडण्यावर दोन्ही पक्षांनी भर दिल्याने, दोन्ही पक्षांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अशातच भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हसळा नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक फोडल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे निवडणूक नगरपालिकांची असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यातच राजकीय लढाई रंगली आहे.

शेकापसाठी अस्तित्वाची लढाई

रायगड हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला मानला जायचा. पण, सध्या शेकापसाठी अस्तित्वाची लढाई आहे. शेकाप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या जनाधाराला ओहोटी लागली आहे. महाविकास आघाडीचे भवितव्य अडचणीत आल्याचे दिसत आहे. अशावेळी जिल्ह्याच्या राजकारणावर घट्ट पकड प्रस्थापित करण्याची संधी महायुतीला होती. पण, महायुतीमधील घटक पक्षांमधील आंतरविरोध महायुतीच्या वाटचालीतील अडसर ठरण्याची चिन्ह दिसत आहेत.

विरोधकांना उभारीची संधी

अलिबाग, खोपोली, माथेरान येथे महायुतीमधील वाद विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवार महायुतीमधील हा वाद विरोधी पक्षांसाठी पुन्हा उभारी घेण्याची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

सोयीस्कर आघाड्यांचा रायगड पॅटर्न

१) पेण, महाड, श्रीवर्धनमध्ये थे शिवसेना शिंदे गटाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत.

२) कर्जत, माथेरान खोपोली, मुरुड-जंजिरामध्ये शिवसेना शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाशी हातमिळवणी केली आहे. ३) शिवसेना शिंदे गटाने अलिबाग, कर्जत, खोपोलीमध्ये भाजपशी युती केली आहे. उरणमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गट एकमेकांविरोधात निवडणुकीत उतरले आहेत.