नुकत्याच संपलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. अवकाळीमुळे ओढवलेल्या संकटात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरूनही अधिवेशनातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी कर्जत-जामखेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सत्ताधाऱ्यांवर खोचक शब्दांत टीका केली. "कुठं महाराष्ट्र गतिमान आहे?" "रोज सकाळी अधिवेशन सुरू व्हायचं, त्याआधी आम्ही पायऱ्यांवर बसून आंदोलन चालू ठेवलं. महागाई वाढली त्यावर केंद्रातही उत्तर नाही आणि राज्यातही उत्तर नाही. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान अशा घोषणा दिल्या. अरे कुठे गतिमान आहे? पेपरमध्ये फक्त यांच्या जाहिराती आणि फोटो. इथं शेतकरी काकुळतीला आला आहे", असं अजित पवार यावेळी म्हणाले. "…म्हणून जाहिरातबाजी करावी लागते" दरम्यान, सरकारकडून जाहिरातींवर केल्या जाणाऱ्या खर्चाचा मुद्दा अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. त्यावरून अजित पवारांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं आहे. "जाहिरातीसाठी १ हजार कोटींचा खर्च केला. ते शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळावी म्हणून खर्च केले असते, तर आम्ही मानलं असतं. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. पण जाहिरातबाजीवर एवढा खर्च मी कदापि होऊ दिला नाही. गरज काय? हे कामं करतात हेच जनतेला कळत नाही. त्यामुळे जाहिरातबाजी चालू आहे", असा टोला अजित पवारांनी लगावला. "आनंदाचा शिधा पाडव्याला देण्याची घोषणा केली. मारे ऐटीत सांगितलं की गुढी पाडव्याला देणार. सांगायचं होतं की २०२३ च्या नाही २०२४ च्या गुढी पाडव्याला देणार आहोत. आम्ही समजून घेतलं असतं. काहीही घोषणा करायच्या आणि त्यांची अंमलबजावणी करायची नाही", असंही अजित पवार म्हणाले. सरकारच्या घोषणाबाजीवर अजित पवारांचं टीकास्र "एवढ्या घोषणा करतात की त्यांच्या तरी लक्षात राहात असतील की नाही मलाच शंका आहे. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. यांनी अर्थसंकल्पात लोकांना बरं वाटावं म्हणून दिवास्वप्नं दाखवायचं काम केलं आहे. पावसाळी अधिवेशनात आम्ही याबाबतचे प्रश्न उपस्थित करू", असं अजित पवार यावेळी म्हणाले. “मोदी सरकारच्या कामाचा वेग बघून तर उसेन बोल्टही…”; राहुल गांधींवरील कारवाईवरून पी. चिदंबरम यांची खोचक टीका! "त्यांना असा झटका देईन की…" "अलिकडच्या काळात एक गोष्ट विचित्र घडली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमनची निवडणूक. यात काय घडलं, काय नाही घडलं, कुणी शेण खाल्लं हे मला चांगलं माहितीये. त्यांना असा झटका देणार आहे की पुढे १० पिढ्या आठवलं पाहिजे. तिथे १४ लोक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारांचे असताना चंद्रशेखर घुलेंसारखा माणूस तिथे पराभूत होतो. दिवसा आमच्याबरोबर आणि मतदानाला त्यांच्याबरोबर अशी औलाद इथे असेल तर त्यांचं काही खरं नाही. अशी माणसं नको आम्हाला. अशी माणसं आम्हाला नको. आम्ही दहा गरीबांकडे जाऊन हात जोडू. गरीब विश्वासाने आपल्याबरोबर राहतात. गरीब शब्दाला पक्के असतात. पण पदं दिलेले काय लावतात, ते आता नाही सांगत. नाहीतर परत म्हणतील यांनी इथं येऊन काय चालवलंय", असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.