Devendra Fadnavis On Ajit Pawar : राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी आमने-सामने आले आहेत. असं असतानाच महायुतीमधील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
यातच भाजपा नेते आशिष शेलार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ‘अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील’, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे. ‘अजित पवारांनी कधी सावरकरांचा विरोध केला नाही आणि सावरकरांच्या विचारांना विरोध आम्हाला मान्य नाही’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजपा नेते आशिष शेलार यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की वीर सावरकरांच्या विचारांना अजित पवारांनी विरोध करण्याचं कारण नाही आणि त्यांनी कधी सावरकरांच्या विचारांना विरोध केला नाही. आजपर्यंत तरी त्यांनी विरोध केल्याचं मी पाहिलं नाही. मात्र, आमची भूमिका पक्की आहे की, वीर सावरकरांच्या विचारांना विरोध आम्हाला मान्य नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आशिष शेलार काय म्हणाले होते?
“आमचे रवींद्र चव्हाण हे म्हणाले आहेत की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरांच्या विचारांवर चालणारे लोक आम्ही आहोत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला (राष्ट्रवादीला) देखील सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आमचे विचार असे आहेत की तुम्ही याल तर आम्ही तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्याशिवाय. विरोधात गेलात तर तुमच्या विरोधात. आम्ही आमचं काम करू”, असं म्हणत आशिष शेलार यांनी अजित पवार यांना इशारा दिला.
अमोल मिटकरींनी काय प्रत्युत्तर दिलं?
“प्रिय आशिष शेलारजी, दादा व दादांचा पक्ष तुमच्या “आदर्शांच्या” नेतृत्वावरच चालला पाहिजे हा जो तुमचा अट्टाहास आहे व हे जे तुम्ही ठासून सांगत आहात त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहीत. तुर्तास इतकंच सांगेल आम्ही “शिव, शाहु, फुले, आंबेडकरी” चळवळीशी बांधील व प्रामाणिक होतो, आहोत आणि राहु. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्वीकारावीच लागते हे त्रिवार सत्य आहे”, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
