scorecardresearch

‘सत्तेचा ताम्रपट’वरुन उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “राज्याचा कारभार उद्धव ठाकरेंच्या…”

सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी अजित पवारांना या पत्रावरुन प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

Raj Thackeray Ajit Pawar
सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली प्रतिक्रिया (फाइल फोटो)

मशिदींवरील भोंग्यांच्यासत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केल्यावर राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. तरी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा देणारे पत्र मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. मात्र आता या पत्रासंदर्भात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय.

सांगलीमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी, “सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन आलेलं नाही हे जगातल्या प्रत्येकाला माहितीय. आम्हालाही सगळ्यांना माहितीय. मी पण बोलून दाखवतो, कालच मी एका सभेमध्ये बोलून दाखवलेलं आहे,” असं म्हटलं.

पुढे बोलताना, “महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं तर कायद्याने, घटनेनेमध्ये लोकशाहीमध्ये १४५ जी व्यक्ती स्वत:च्या पाठीशी उभी करु शकते ती व्यक्ती मुख्यमंत्री होते. हे त्रिवार सत्य आहे. त्यामध्ये कोणीही काही सांगितलं, अमक्याने व्हावं तमक्याने व्हावं, असा सांगायचा किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याला कोणी नाकारणार नाही. पण कायदा सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस यंत्रणेला सतर्क केलेलं आहे.
अशापद्धतीने काम करताना काही अल्टीमेटम देतात हे ही बरोबर नाही,” असंही अजित पवार म्हणाले.

“राज्याचा कारभार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चाललाय. त्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता. त्यापुर्वी पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, विलासराव यांच्यासारख्या वेगवेगळ्या मान्यवरांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे हे गेल्या अनेक वर्ष आपण पाहतोय. हे पाहत असताना त्यामध्ये कोणीही राज्यकर्ते असले तरी त्यांना कायद्याच्याबाहेर, संविधानाच्या बाहेर, घटनेच्याबाहेर जाऊ शकत नाही. तसेच कोणी जाऊ इच्छितही नाही. त्यामुळे अल्टीमेटम ही हुकूमशाहीची भाषा आहे. ही लोकशाही आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

“तुम्हाला तुमची मतं मांडण्याचे अधिकार आहेत पण मतं मांडताना दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होणार असेल. माझ्या वक्तव्यांमुळे समाजात दुही माजणार असेल तर माझ्यावरही कारवाई करण्याचा अधिकार पोलीस खात्याला आहे. पोलीस खात्याला सांगण्यात आलेलं आहे की कशापद्धतीने काय वागलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. इथं कार्यक्रम घेतला तेव्हा काय काय सुरक्षा बाळगायची हे सांगितलं जातं. प्रतिक पाटील यांच्या कार्यक्रमालाही पोलिसांनी हे सांगितलं असणार आणि आयोजक म्हणून त्यांनी हे केलं पाहिजे. जसं हे आहे तसेच परवानगी देताना काही नियम ठरवलेले असतात आणि त्याचं पालन करायचं असतं,” असं अजित पवार यांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar on raj thackery letter to cm uddhav thackeray scsg

ताज्या बातम्या