संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा निवडणुकीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरू लागला आहे. कोणत्या पक्षाचे किती आमदार यावरून राज्यसभेत जाणाऱ्या ६ सदस्यांची निश्चिती होणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाकडून किती सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतील, हे ठरणार असल्यामुळे आता आकडेमोडीला वेग आला आहे. विशेषत: त्या त्या पक्षांचे आमदार वगळता अपक्ष आमदार आपली मतं कुणाच्या पारड्यात टाकणार, यावरून कोणत्या पक्षाचा अतिरिक्त सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार हे ठरणार आहे. या सर्व आकडेमोडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर दोन वर्षांनी राज्यसभेच्या ६ सदस्यांची टर्म संपुष्टात येते. त्याजागी नवीन सदस्य किंवा त्याच सदस्यांचीही पुन्हा निवड होऊ शकते. मात्र, यासाठी त्या त्या पक्षाकडे आमदारांची किती मतं आहेत, हे विचारात घेतलं जातं. यानुसार राज्यसभेत खासदार निवडून जाण्यासाठी ४२ विधानसभा आमदारांची मतं आवश्यक असतात. या गणितावर आधारित आकडेमोड अजित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडली.

अजित पवारांनी मांडली आकडेमोड!

“काँग्रेस एक, शिवसेना दोन, राष्ट्रवादी एक जागा लढवत आहे. भाजपाच्या दोन जागा सहज निवडून येत आहेत. तिसऱ्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेकडे काही मतं आहेत. गेल्या वेळी शिवसेनेने शरद पवारांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार फौजिया खान यांच्या पाठिशी त्यांची मतं उभी केली होती. तेव्हा पुढच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, असं शरद पवारांनी शिवसेनेला सांगितलं होतं. त्यानुसार आता शिवसेना जो उमेदवार उभा करेल, त्याच्या पाठिशी आमची मतं असतील”, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. भाजपाच्या हातात दोन सदस्य निवडून जातील आणि वर पुन्हा अपक्ष धरून २७-२८ मतं अतिरिक्त असतील. शिवसेनेकडे देखील काही मतं अतिरिक्त असतील, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“…एवढीच माफक अपेक्षा”, अनिल परबांच्या घरावरील ईडीच्या धाडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया!

अतिरिक्त मतांवर निवडणूक होणार

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी एक, शिवसेना दोन आणि भाजपा दोन असं गणित असूनही निवडणूक होणार असल्याचे सूतोवाच अजिच पवारांनी केले आहेत. “माझा अंदाज आहे की निवडणूक बिनविरोध होणार नाही. निवडणूक होईल. पक्षाचे अधिकृत मतदार दाखवून मतदान केलं जातं. मला काल माहिती मिळाली आहे की अपक्षांना दाखवण्याचा अधिकार नाही. मागे गुजरातमध्ये असं काही झालं तेव्हा ती मतं अवैध ठरली गेली. त्यामुळे अपक्षांनीही ज्या पक्षाचे सहयोगी असतील, त्यांना दाखवण्याचं काम केलं असतं, तर निवडणूक बिनविरोध झाली असती. पण आता सगळा खेळ अपक्षांवर आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

बिनविरोध होण्याची शक्यता मावळली ; संभाजीराजे यांचा भाजप वापर करून घेणार?

संभाजीराजेंच्या उमेदवारीचं काय?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून जोरदार चर्चा सुरू होती. त्यावर देखील अजित पवारांनी भूमिका मांडली. “संभाजीराजे शरद पवार, उद्धव ठाकरेंशी बोलले. देवेंद्र फडणवीसांशीही बोलले. त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला कळायला मार्ग नाही. शिवसेना पहिल्यापासून म्हणतेय की आमच्या पक्षाचं तिकीट घेतलं तर आम्ही उमेदवार करायला तयार आहोत. प्रत्येकाचा तो अधिकार आहे”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on rajyasabha election bjp shivsena numbers sambhaji raje pmw
First published on: 26-05-2022 at 12:29 IST