Ajit Pawar Passes Away : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथील विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी साधारण ९ ते ९.३० च्या सुमारास ही बातमी आली आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. या बातमीनंतर खासदार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, अजित पवारांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सगळेच पवार कुटुंबीय हे बारामतीत पोहचले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या अशा अकाली एक्झिटने त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. अजित पवार यांनी आठ महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात ही इच्छा बोलून दाखवली होती.

काय म्हणाले होते अजित पवार?

आठ महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले होते, “महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असं काहींनी सांगितलं. आपल्याला हे वाटतं. पण योग जुळून यावा लागतो. मलाही वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं पण योग कुठे जुळून आला? कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही. ज्या प्रमाणे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या, जयललिता मुख्यमंत्री झाल्या, त्यांच्यावर चित्रपटही निघाला. अशी नावं आपल्याला घेता येतील” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला?

१) सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.

२) सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अजित पवारांचं विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.

३) सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला.

अजित पवारांच्या विमानात त्यांच्यासह कोण होतं?

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

शेकडो कार्यकर्ते शोकाकुल

बारामती येथील अहिल्याबाई होळकर रुग्णालयाच्या बाहेर हजारो लोक जमले. अजित पवार परत या अशी घोषणा देत आहेत. धडाडीचे नेते, कार्यक्षम नेते अशी अजित पवार यांची ओळख होती. प्रशासनावरती जबरदस्त पकड असलेला माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. आज सकाळी बारामतीत येत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि याच अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. आमचा जबाबदार माणूस गेला, आमचं अस्तित्व आता संपलं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे जी ते बोलून दाखवत आहेत.