Ajit Pawar Photo Missing from party banner triggers intense political heat as Rohit Pawar slams Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यातील एक बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या बॅनवरून राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे फोटो लावण्यात न आल्याने वाद पेटला आहे. या बॅनरची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान पक्षाचे नेते अमेल मिटकरी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत भाष्य केले आहे.

या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी स्टेजवर मागे लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांचा फोटो नव्हता, मात्र सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे फोटो मात्र दिसून आले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचा फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. रोहित पवार म्हणाले की, “मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा ७/१२ स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण…. जे आम्ही वारंवार बोलतोय…”

अमोल मिटकरींचीही टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, “ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही.राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही.”

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचासुनील तटकरे यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीही केला आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवड या सारख्या मुद्द्यावरून आधीच सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवारांचाच फोटो गायब झाल्याने पुन्हा तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे.

अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया

दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अदिती तटकरे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. “स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते,” असे त्या म्हणाल्या आहेत.

“अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच. धन्यवाद!” असेही त्या म्हणाल्या आहेत.