दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शंका उपस्थित केल्या आहेत. अजित पवार यांच्या विमानाची उड्डाणाची काळजी घेतली गेली होती का? इथपासून ते अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान कराळे मास्तर नावाने प्रसिद्ध असलेले नितेश कराळे यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. आज नितेश कराळे यांनी पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हटलं आहे कराळे मास्तरांनी?

“अजितदादा हे शक्यतो रोडनेच प्रवास करत असत. त्यांना सल्ले देण्यात आला होता की विमानाने वेळ वाचवण्यासाठी प्रवास करा. पण विमान कंपनीचे अधिकारी पळून गेले, त्यांचं जे ऑफिस होतं ते सुद्धा तिथे नाही. पुण्याचं विमानतळ असताना व्हिजिबिलिटी नव्हती अशा बारामतीच्या विमानतळावर विमान का नेलं? पुण्याला का नेलं नाही? असे प्रश्न उपस्थित होतातच. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले आणि घातपात असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे? ते पण समोर आलं पाहिजे. पायलट का बदलले गेले? याची चौकशी झाली पाहिजे. काहीही सांगता येत नाही राजकारणात. १२ तारखेला विलीनीकरणाच्या चर्चा होत्या आणि नेमका हा अपघात किंवा घातपात कसा झाला? या सगळ्याची चौकशी करुन अहवाल समोर यायला पाहिजे.” असं कराळे मास्तरांनी म्हटलं आहे.

अजित पवारांचा अपघात हा घातपातच आहे असं मला वाटतं-कराळे मास्तर

मला माझं मत विचारलं तर हेच सांगेन की अजित पवारांचा अपघात हा घातपात असावा. कारण या आधीही अशा घटना घडल्या आहेत ज्याची सखोल चौकशी झालेली नाही. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे आणि अहवाल समोर आला पाहिजे. मला तरी असं वाटतं आहे की हा घातपाताचा प्रकार आहे. या प्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि अहवाल दडपला जाऊ नये. कारण तसं घडलं तर आम्हाला पाठपुरावा करावा लागेल असंही कराळे मास्तरांनी म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं पाहिजे. कारण त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल असंही कराळे मास्तरांनी म्हटलं आहे. पण शेवटी जो काही निर्णय घ्यायचा असेल तो शरद पवार घेऊ शकतील मी त्याबाबत भाष्य करणं योग्य नाही. पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत ते आम्हाला कार्यकर्ते म्हणून मान्य असेल असंही कराळे मास्तरांनी म्हटलं आहे.