Ajit Pawar plane crash case investigation intensifies as Maharashtra Police takes over the Zero FIR from Karnataka : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या सखोल चौकशीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. हा मुद्दा त्यांनी चांगला लावून धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल केला जावा यासाठी ते प्रतत्न करत होते. अखेर सोमवारी कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने एफआयआर दाखल करून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला आहे. यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आता महाराष्ट्र पोलीस दलाची जबाबदारी वाढली असल्याचे म्हटले आहे.
रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असल्याचे म्हटले आहे. “अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये दाखल केलेला गुन्हा कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला आहे. आता परीक्षा आहे महाराष्ट्र पोलीस दलाची… या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला साजेसा सखोल तपास महाराष्ट्र पोलीस या गुन्ह्याचा करतील आणि राज्य सरकारही त्यासाठी सहकार्य करेल, ही अपेक्षा!”
कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे- रोहित पवार
रोहित पवार यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट करत एफआयआर दाखल झाल्याबद्दल माहिती दिली होती. तसेच अजित पवारांच्या मृत्यूला कारणीभूत असलेली शक्ती कितीही मोठी अली तरी त्यांना शिक्षा व्हावी यासाठी लढू असा निर्धार देखील रोहित पवारांनी व्यक्त केला होता. रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की “अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल (सोमवार, दि. २३ मार्च) कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने एफआयआर दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला, याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या एफआयआरचा तपास कशा पद्धतीने होतो याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू…! हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू! #महाराष्ट्र_धर्माने आम्हाला लढायला शिकवलं असून या शिकवणुकीप्रमाणे काम करत राहू..!”
सुप्रिया सुळेंकडून कौतुक
अजित पवार अपघात प्रकरणातील सत्य बाहेर यावे यासाठी रोहित पवार करत असलेल्या प्रयत्नांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत रोहित पवार घेत असलेली मेहनत सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. “महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अखेर झीरो एफआयआर दाखल झाला. आमदार रोहित पवार यांनी यासाठी घेतलेली अविश्रांत मेहनत फळाला आली. रोहित यांनी अनेक जिल्ह्यांतून प्रवास केला. एकामागून एक पोलीस स्टेशन्सना भेटी दिल्या. बारामती, मुंबई, दिल्ली, बंगळुरू अशा अनेक शहरांमध्ये ते गेले आहेत. अनेक नेते, अधिकारी यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मनापासून काम केले. स्व. अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवार घेत असलेली मेहनत आणि जिद्द आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. रोहितच्या या अविश्रांत मेहनतीबद्दल त्याचे मनापासून कौतुक; तसेच राजू दादा आणि सुनंदा वहिनींचे मनापासून आभार.”
