मुंबई : विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. पण, ब्लॅक बॉक्स बंद ठेवल्याचे, ब्लॅक बॉक्स जळून खराब झाल्यामुळे तो परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवून विश्लेषण करून घेण्याच्या बातम्यांची चर्चा सुरू आहे. अचानक सुरू झालेल्या चर्चांमुळे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नाही, तर घातपात झाल्याचा संशय बळावला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली. पण, अजून तपास यंत्रणांना समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर २० दिवस झाल्यानंतरही तपासाला वेग आला नाही. केवळ व्हीएसआर कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना ? की कंपनीवर कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे, असे रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले आहे.

अपघाताचा दुर्दैवी अपघाताला वीस दिवस उलटून गेल्यानंतरही डीजीसीएकडून प्राथमिक चौकशी अहवालही आलेला नाही. सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या व्हीएसआर कंपनीविरोधात देखील काहीही अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. परिणामी माझा संशय बळावत आहे. सोमवारी अचानक अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ठेवल्याच्या, अपघातात ब्लॅक बॉक्स जळून खराब झाल्याची आणि खराब ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणासाठी परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठविण्याचे वृत्त समोर येत आहे. ही चर्चा आताच का समोर आली. जाणीवपूर्वक समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी या बातम्या पसरविल्या जात आहेत का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. दिवसभर सुरू असलेल्या चर्चांवरून मी व्यक्त केलेला घातपाताचा संशय बळावला आहे. आम्ही मात्र अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

माणसाला काही किंमत आहे की, नाही

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचे समोर आले आहे. अपघात झालेल्या दिवशी दुपारी तीन वाजता पहिले प्रमाणपत्र दिले. त्यानंतर २८ जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत एकूण ७५ संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचे समोर आले आहे. माणसाला काही किंमत आहे की, नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.