Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन विविध मुद्द्यांची मांडणी केली. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही तपास यंत्रणा ढिम्म असून तपासाला वेग आलेला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यानंतर अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली होती. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत तपासाबाबत मत व्यक्त केले आहे.
रोहित पवार यांनी ९ फेब्रुवारी रोजी पहिली पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी दुसरी पत्रकार परिषद घेत विमान अपघाताचा तपास, ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा आणि इतर शंका उपस्थित केल्या होत्या. यानंतर जय पवार यांनीही इन्स्टाग्रामवर स्टेटस शेअर करत ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही, असे म्हटले होते. यामुळे रोहित पवारांनंतर पवार कुटुंबातून इतरही लोक बोलत असल्याचे दिसले.
रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदांची चर्चा असताना पवार कुटुंबातील इतर सदस्य त्यावर फारसे व्यक्त होताना दिसले नव्हते. मात्र आता जय पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही यावर भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत.”
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये, यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाला घटनेने दिलेला अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.”

