Rohit Pawar in Ajit Pawar plane crash case DGCA action on VSR company : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. हा विमान अपघात सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. डीजीसीए आणि सीआयडीकडून या अपघातप्रकरणी चौकशी सुरू आहे. दरम्यान, डीजीसीएच्या पाच विमांनाना उड्डाणांस बंदी घालण्यात आली असल्याची माहिती डीजीसीएने दिली. डीजीसीएच्या या कारवाईनंतर आता रोहित पवारांनी मोठं पाऊल उचललं आहे. ते आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन व्हिएसआर कंपनीचे मालक, डीजीसीएचे अधिकारी, अजित पवारांना हे विमान देणारे अधिकारी आणि घातपाताचा संशय असल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. आज रोहित पवारांनी विधानभवनात प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

“अजित पवारांचा मृत्यू ज्यादिवशी झाला तो आमच्या सर्वांसाठी काळा दिवस. त्या दिवसानंतर आतापर्यंत अनेक सामान्य लोकांना प्रेमापोटी वाटतंय की दादा आज कुठेतरी बाहेर येतील आणि आपल्याला भेटतील. तशी इच्छा आमची असली तरीही आम्हा सर्वांना माहित आहे की तो दिवस दुर्दैवाने येणार नाही. जनतेची इच्छा आहे की जो घात – अपघात झाला त्याबाबत माहिती आली पाहिजे आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे. याकरता महाराष्ट्रातील सामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला हे सर्व त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोणी सोशल मीडियावर, कोणी चहाच्या टपरीवर, गवत खुरपत असताना महिला एकत्र येऊन लाडकी बीहण योजना ज्यांनी आणली तेच आता राहिले नाहीत, असं बोलत आहेत. युवासुद्धा आता चर्चा करत आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील तमाम जनता लिहित आहे, वाट पाहत”, असं रोहित पवार म्हणाले.

पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार

“हा लढा लढत असताना एक ताकद एकत्रित आली, त्यामुळे आता असं जाणवायला लागलं आहे की ज्या दिशेने तपास जायला पाहिजे त्या दिशेने जात आहे. पण काही गोष्टी जाणवतात. याबाबत डीजीसीएने काल अहवाल दिला. त्या अहवालावर मी बोलेनच. पण डीजीसीएने आतापर्यंत कोणते अहवाल दिले, ते क्रमवारीने मांडेन. दोन दिवसांत मी अजून एक पत्रकार परिषद घेणार आहे. तेव्हाही अनेक गोष्टी सांगणार आहे”, असंही ते म्हणाले.

व्हीसीआर कंपनीला वाचवण्याचा पहिला प्रयत्न

“२८ जानेवारीला जेव्हा दादांचं शव रुग्णालयात होतं, पोस्टमार्टम सुरू होतं, अख्खा महाराष्ट्र दुख:त होता तेव्हा डीजीएसने व्हिसीआरला क्लिन चीट देण्याचा प्रयत्न केलला. लेव्हल १ ची कोणतीही अडचण जाणवली नसल्याचं हा अहवाल होता”, व्हिसीआरला वाचवण्याचा हा पहिला प्रयत्न होता असा आरोप रोहित पवारांनी केला.

डीजीसीएने कारवाई केली, पण…

“डीजीसीएच्या अहवालामुळे नखाएवढं यश मिळालं. डीजीसीएने स्पेशल सेफ्टी ऑडिट केलं. त्यात अनेक त्रुटी जाणवल्या. विमान उडवण्याच्या आधी विमान उडण्याच्या लायक आहे का हे तपासलं जातं. पण त्यात बऱ्याच त्रुटी दिसल्या, त्यामुळे या विमान कंपनीच्या विमानांना उड्डाणास बंदी आणली आहे. ते करायला हरकत नाही. ते करायलाच पाहिजे. त्यात कोणीही बसला असता तर त्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. पण यातही डीजीसीएने त्यांच्या सुटकेचा एक मार्ग मोकळा सोडला आहे. ते म्हणजे त्या विमानांचं मेन्टेनस करायचं, डॉक्युमेंट्स करायचे आणि मग ते उडवायचे”, असा आरोप रोहित पवारांनी केलाय.

डीजीसीएवरही कारवाई झाली पाहिजे

एअर वर्थिनेस सर्टिफिकेट कोण देतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची असते? ही डीजीसीएची जबाबदारी आहे. त्यामुळे व्हिसीआरने चूक केली असेल तर डीजीसीएनेही चूक केली आहे. त्यामुळे व्हिसीआर वेन्चरच्या कंपनीच्या मालकावर कारवाई झाली पाहिजे, तसंच या चौकशीच्या संबंधित डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवरही करवाई झाली पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवारांचा पुढचा प्लान काय?

रोहित पवार पुढे म्हणाले, मी आता मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन डीजीसीएविरोधात, व्हिसीआर कंपनीच्या मालकाविरोधात, अजित दादांना हे विमान देण्याबाबत ज्या अधिकाऱ्याने निर्णय घेतला त्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याकरता तक्रार दाखल करणार आहे. तसंच, या अपघातात घातपाताचा संशय आहे. त्यामुळे अज्ञाताविरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.”