Pinky Mali father on Rohit Pawar Claim: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथील विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेला १३ दिवस पूर्ण झाल्यानंतर अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी (दि. १० फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवली. तसेच या संपूर्ण प्रकरणावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर आता या विमान अपघात निधन पावलेल्या फ्लाईट अटेन्डंट पिंकी मालीच्या कुटुंबियांनी वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवारांच्या दाव्यावर आपले मत व्यक्त केले.
पिंकी मालीच्या कुटुंबियांनी नुकताच टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेतील दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. पिंकी मालीचे वडील म्हणाले, “रोहित पवार यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण घातपात झाल्याची शंका घ्यायला जागा आहे. कारण माझी मुलगी पिंकीने पाच वेळा अजित पवार यांच्याबरोबर प्रवास केला. त्यापैकी चार वेळा काळ्या रंगाचे विमान होते. पण पाचव्यांदा पांढऱ्या रंगाचे चार्टड विमान का निवडले गेले?”
पिंकी मालीचे वडील शिवकुमार माली पुढे म्हणाले, “रोहित पवारांनी सांगितले त्याप्रमाणे सकाळच्या वेळेस ट्राफिक नसते. तरीही वैमानिक बदलला गेला. याची चौकशी व्हायला हवी.”
पिंकीने आदल्या दिवशी मला फोन करून अजित पवारांबरोबर प्रवास करणार असल्याचे म्हटले होते. बारामतीला पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमच्याशी फोनवर बोलेन, असे पिंकीने सांगितले होते. तुला काय बोलायचे आहे? असे विचारले असता तिने सांगितले की, मला खूप काही बोलायचे आहे. पण दुर्दैवाने लँडिंगवेळी अपघात झाला, असेही शिवकुमार माली यांनी सांगितले.
विमान कंपनीवर केले आरोप
शिवकुमार माली टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीवर आरोप केले. ते म्हणाले, अपघात झाल्यानंतर कंपनीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. माझे जावई आणि नंतर मी स्वतः बारामतीला जाऊन पिंकीचा मृतदेह आणण्यासाठी गेलो. आम्ही गेलो नसतो तर तिचा मृतदेहही आमच्या हाती लागला नसता. त्यानंतरही कंपनीने आमच्याशी संपर्क साधलेला नाही. तिचे वेतन, भत्ते आणि विम्याबाबत काहीही आम्हाला सांगितले नाही.
रोहित पवार यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले
- १६ वर्षे जुने विमान अद्याप हवाई वाहतूक सेवेत कसे होते.
- विमान उड्डाण करण्याच्या स्थितीत होते का. त्याची तपासणी कुणी केली.
- युरोपात बंदी असताना देशात वाहतुकीला परवानगी कशी दिली गेली.
- अपघाताग्रस्त विमानाची देखभाल – दुरुस्ती कुठे केली जात होती.
- विमानात हवाई इंधन भरलेले कॅन होते का.
- विमानाची स्थिती सांगणारे ट्रान्सपॉन्डर बंद का होते.
- फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उशिराने का आली.
अनुभवी संस्थांकडून चौकशी व्हावी
विमान अपघाताची चौकशी सीआयडी आणि डीजीसीएच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. आमचा या संस्थांवर विश्वास आहे. पण, सीआयडीला अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करण्याचा अनुभव नाही. त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यांना विमानतळावर प्रवेश करण्याचाही अधिकार नाही. डीजीसीएसह फ्रान्सच्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा तपासणी आणि विश्लेषण ब्युरो (बीईए) आणि ब्रिटनच्या विमान अपघात तपासणी शाखेकडून (एआयबी) चौकशी केली जावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
