Ajit Pawar Plane Crash Latest Update : महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा बारामती येथे भीषण अपघात झाला. लँडिंगचा प्रयत्न केला जात असताना विमान जमिनीवर कोसळली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातानंतर विमानातील सुरक्षितता प्रणालीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान आता कायदेशीर अंतिम मुदतीत फक्त २८ दिवसांचा फरक राहिल्याने हे विमान त्या सॅटेलाईट-आधारित यंत्रणेपासून वंचित राहिले का? असा सवाल उपस्थित होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही यंत्रणा खराब हवामानात विमानाच्या लँडिंगसाठी अत्यंत मदतीची ठरली असती.
विमानाच्या नोंदणीच्या कालावधीची प्राथमिक पडताळणी केली असता, त्यामध्ये असे आढळून आले आहे की, या १६ वर्षे जुन्या लिअरजेट विमानामध्ये कदाचित भारताची गगन (GAGAN) ही उपग्रह-आधारित मार्गदर्शन प्रणाली बसवलेली नसावी. ही तंत्रज्ञान प्रणाली अनिवार्य करणारा नियम लागू होण्यापूर्वी काही दिवस आधीच या विमानाची नोंदणी झाली होती.
बारामती विमानतळापासून थोड्याच अंतरावर झालेल्या या विमान दुर्घटनेत अजित पवार आणि इतर चार जणांचा मृ्त्यू झाला. कमी दृश्यमानता असताना दुसर्यांदा लँडिंगच्या प्रयत्नादर्मयान विमान जमिनीवर कोसळले असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
देशभरातील बहुतेक मोठ्या विमानतळांवर विमानांच्या लँडिंगसाठी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) या ग्राउंड-बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान वैमानिकांना कमी दृश्यमानता स्थितीमध्ये अचूक मार्गदर्शन करते. याला ‘इन्व्हिजिबल ग्लाइड पाथ’ असेही म्हटले जाते, आयएलएसमुळे वैमानिकांना सुरक्षितपणे लँडिग करता येते धावपट्टी धुक्यामुळे किंवा पावसामुळे अस्पष्ट दिसत असली तरीही अंदाज घेऊन वैमानिक लँडिंग करू शकतात. पण इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम बसवणे खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असते. म्हणून बारामतीसारख्या छोट्या प्रादेशिक विमानतळांवर ही यंत्रणा सहसा उपलब्ध नसते.
ही दरी भरून काढण्यासाठी भारताने आपली स्वत:ची सॅटेलाईट-आधारित अग्युमेंटेशन सिस्टम, गगन (GAGAN – GPS Aided Geo Augmented Navigation) विकसित केली आहे. जमिनीवरील महागड्या यंत्रणेवर अवलंबून राहाण्याऐवजी गगन ही प्रणाली उपग्रहाच्या मदतीने वैमानिकांना विमानाचे लँडिंग करताना अचूक मार्गदर्शन करते. विशेषतः ज्या विमानतळांवर आयएलएस सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी ही यंत्रणा वापरली जाते.
मात्र यासाठी विमानामध्येही या सॅटेलाईट सिस्टमशी संवाद साधू शकण्यास अनुरूप एव्हिओनिक्स बसवलेली असणे आवश्यक असते. या हार्डवेअरशिवाय, गगनचे मार्गदर्शन घेतले जाऊ शकत नाही.
काही आठवड्यांनी वेळ चुकली
बारामती येथे झालेल्या विमान अपघातातील लिअरजेटची नोंदणी भारतात २ जून २०२१ रोजी झाली होती. या नोंदणीनंतर अवघ्या २८ दिवसांनी, म्हणजेच १ जुलै २०२१ पासून, एक नवीन रेग्युलेटरी नियम लागू झाला. या नियमानुसार, त्यानंतर नोंदणी होणाऱ्या सर्व नवीन विमानांमध्ये गगन सारखी उपग्रह-आधारित नेव्हिगेशन आणि अप्रोच सिस्टम असणे बंधनकारक करण्यात आले होते.
पण या अखेरच्या मुदतीच्या आधी या विमानाची नोंदणी झाली होती, त्यामुळे कायद्यानुसार त्याला उपकरणे अपग्रेड करण्याचे कायदेशीर बंधन नव्हते. त्यामुळे एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते या विमानात कमी दृश्यमानतेच्या स्थितीमध्ये लॅंडिग करतेवेळी वैमानिकाला अचूक मार्गदर्शन करू शकले असे प्रगत सॅटेलाईट मार्गदर्शन या अपघातग्रस्त विमानाकडे नव्हते.
या अपघातग्रस्त विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत चालवले जात होते. हे विमान साधारणपणे १६ वर्षे जुने होते.
जुन्या पद्धतीने लँडिंग
बारामती एअरपोर्ट ही एक अनकंट्रोल्ड एअरफिल्ड आहे, म्हणजे येथे विमान उड्डाणाच्या प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण ठेवणारे पूर्णवेळ एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स नसतात. ट्राफिकबद्दलची माहिती ही साधारणपणे स्थानिक फ्लाइंग ट्रेनिंग संस्थांमधील प्रशिक्षक आणि वैमानिकांकडून दिली जाते.
अशा परिस्थितीमध्ये आयएलएस किंवा सॅटेलाईट-आधारित प्रक्रिया नसल्याने वैमानिकांना पारंपरिक स्टेप डाऊन अप्रोचेसवर अवलंबून राहावे लागते. त्यांना एकसंध, स्थिर ग्लाइड पाथ ऐवजी विमान टप्प्याटप्प्याने खाली येत जाते, जेथे वैमानिकांना एका ठराविक वेळानंतर स्वतःच्या डोळ्यांनी रनवे पाहावा लागतो. स्वच्छ हवामानात ही एक नियमित प्रक्रिया असते; मात्र जेव्हा धुके असते किंवा दृश्यमानता कमी होते, तेव्हा असे लँडिंग आव्हानात्मक बनते.

