Ajit Pawar Co Pilot Shambhvi Pathak : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झालं. अजित पवार हे एका खासगी विमानाने मुंबईवरून बारामतीला जात असताना विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला आणि यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर आणि सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला. बारामतीला जाण्यापूर्वी सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी त्यांच्या आजीला एक मेसेज केला होता. ‘Hi Dadda Good Morning…’, असा मेसेज शांभवी यांनी त्यांच्या आजीला केला होता. त्यांच्या या मेसेजला आजीने ‘Good Morning Cgeeni’, असं म्हणत रिप्लाय देखील दिला होता.

शांभवी पाठक यांचा हाच मेसेज शेवटचा ठरेल याची आपण कल्पनाही केली नव्हती, असं म्हणत त्यांच्या आजीने दु:ख व्यक्त केलं आहे. शांभवी पाठक या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या रहिवासी होत्या, त्यांना त्यांचे कुटुंबीय प्रेमाने ‘चिनी’ म्हणत असत असं शांभवी पाठक यांच्या आजीने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

विमान अपघातातील मृतांची नावे

बारामती विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अधिकारी विदिप जाधव, पिंकी माळी आणि कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला आहे.

शांभवी पाठक कोण होत्या?

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शांभवी पाठक या फर्स्ट ऑफिसर होत्या. सहवैमानिक म्हणून त्या सुमीत कपूर यांना सहकार्य करत होत्या. फ्लाईट इनस्ट्रक्शन, ट्राफिक कंट्रोलशी संवाद साधणे आणि विमान उड्डाणादरम्यानचे निर्णय घेण्याचे काम पाठक करत होत्या.

शांभवी पाठक यांचे वडील लष्कारात होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एअर फोर्स बाल भारती शाळेतून त्यांनी आपले शिक्षण घेतले होते. शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठाच्या एरोनॉटिक्स, एव्हिएशन आणि एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पायलट अकादमीतून व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. गेल्या काही वर्षांत वैमानिक म्हणून महिलांचा सहभाग वाढला आहे. शांभवी पाठक त्याचेच एक प्रतीक होत्या.

सुमीत कपूर कोण होते?

कॅप्टन सुमीत कपूर हे अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड म्हणून काम पाहत होते. फ्लाईट क्रूचे नेतृत्व तेच करत होते. टेक ऑफ आणि लँडिंगचे नेतृत्वही त्यांच्याकडे होते. सुमीत कपूर यांच्याकडे वेगवेगळ्या विमानांचा मिळून १६ हजार तास उड्डाणाचा अनुभव होता. व्हीएसआर कंपनीचे अधिकारी विके सिंह यांनी म्हटले की, दोन्ही पायलट हे दिल्लीचे होते आणि त्यांच्याकडे उड्डाणाचा बराच अनुभव होता. तसेच सदर विमान उड्डाणासाठी १०० टक्के सुरक्षित होते, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.