Ajit Pawar Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. २८ जानेवारी रोजी सकाळी ही घटना घडली. अजित पवार हे एका खासगी विमानाने मुंबईवरून बारामतीला जात असताना विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. अनेक नेते ढसाढसा रडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि खासदार निलेश लंके यांनी तर आक्रोश करत टाहो फोडला आहे. अमोल मिटकरी आणि निलेश लंके या दोघांचाही आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर निलेश लंके आणि अमोल मिटकरी ढसाढसा रडले आहेत.

अजित पवारांचा अपघाती मृत्यू, सुप्रिया सुळे ढसाढसा रडल्या

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार हे सगळे दिल्लीहून बारामतीत पोहोचले. बारामतीत पोहोचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे ढसाढसा रडल्या. सुप्रिया सुळे या विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचा उल्लेख तुमचा एकदम लाडला असा उल्लेख केला. यानंतर त्या मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. सुनेत्रा पवार यांना देखील अश्रू थांबवता आले नाहीत.

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर शरद पवारांची प्रतिक्रिया

“अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला आहे. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही, पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“मी आज मीडियासमोर येणार नव्हतो, पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली असं कळलं. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया यात राजकारण आणू नये, एवढंच सांगायचं आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.