महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही पोस्ट लिहून व्हिएसआर कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. जय पवार यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन पोस्ट लिहिल्या आहेत.

जय पवार यांनी व्हिडीओ पोस्ट करत काय म्हटलं आहे?

माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो — या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी. अशी पोस्ट जय पवार यांनी केली आहे.

जय पवार यांची दुसरी पोस्ट नेमकी काय आहे?

तर अजित पवारांच्या विमान अपघाताचा फोटो पोस्ट करत जय पवार यांनी दुसरी पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, “DGCA ने ज्या मुद्द्यांवर VSR Ventures ची काही विमानं ग्राऊंड केली आहेत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्ये त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारु शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भात नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण ताफ्याचे पूर्णपणे संचलन बंद करण्याचाही DGCA ने विचार करावा.” अशी आणखी एक पोस्ट लिहून जय पवार यांनी DGCA कडे VSR कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.

Ajit Pawar Plane Crash
डीजीसीएने २४ फेब्रुवारीच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचे दोष दाखविले गेले. तसेच व्हीएसआर कंपनीचे पाच विमान ग्राऊंड करण्यात आले. जर ही विमाने ग्राऊंड करण्यात आली असतील तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदोष विमान चुकून दिले की, जाणूनबुजून दिले? याचा तपास करणे आवश्यक असल्याचे रोहित पवार म्हणाले.

जय पवार यांनी या दोन पोस्ट लिहिल्या आहेत आणि VSR कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या मागणीला सरकारकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर रोहित पवार यांनी १० आणि १९ फेब्रुवारीला दोन पत्रकार परिषदा घेऊन प्रश्न उपस्थित केले होते. तसंच २६ फेब्रुवारीला त्यांनी VSR कंपनीबाबत बारामतीत पोलीस तक्रार दाखल केली होती.