Ajit Pawar Plane Crash : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी एका भीषण विमान दुर्घटनेत निधन झाले आहे. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून महाराष्ट्र आणि देशभरातील नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. यादरम्यान या विमान दुर्घटनेच्या कारणांची चर्चा सुरू झाली असून या अपघाताची सखोल चौकशी केली जाणार आहे. यादरम्यान निवृत्त वैमानिक आणि एव्हिएशन एक्सपर्ट एहसान खालिद यांनी या अपघाताबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

खालिद यांनी अजित पवारांच्या अपघातामध्ये बारामती विमानतळाची कुठलीही भूमिका नसल्याचे म्हटले आहे. विमान रनवे सुरू होण्याची आधी कोसळल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला आहे. “मला वाटत नाही की, बारामतीच्या रनवेची या दुर्घटनेत काही भूमिका आहे, कारण विमान रनवेवर आलेच नाही. हा अपघात रनवे सुरू होण्याच्या आधी आणि रनवेच्या बाहेर झाला. त्यामुळे रनवे हे अपघाताचे कारण नाही. जर हे (दुर्घटना) दृश्यमानता आणि हवामानाची स्थिती याच्याशी संबंधित असेल, तर रनवे हा आयएलएस आणि इतर इन्स्ट्रूमेंट सिस्टम्सनी सज्ज असता, आणि यामुळे कमी दृश्यमानता असतानाही वैमानिकाला योग्य मार्गदर्शन मिळाले असते, तर होय हे टाळता आले असते. यामध्ये काही तांत्रिक बिघाड होता की नाही? याबाबतच्या कुठल्याही निष्कर्षापर्यंत येण्यासाठी खरंतर आपल्याकडे पुरेसी माहिती उपलब्ध नाही”, असेही खालिद म्हणाले.

नेमकं काय झालं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ हे खासगी व्यावसायिक विमान बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती येथे कोसळले. दुसर्‍यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना झाली. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान व्हिएसआर व्हेचंर्स प्रा. लि. कंपनीकडून चालवले जात होते. तर अपघातग्रस्त विमान VT-SSK या नावाने नोंदणी केलेले होते.

कंपनीने काय म्हटले?

व्हीएसआर व्हेचंर्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर विमानाला कोणतीही समस्या नव्हती. इंडिया टुडेशी बोलताना व्हीएसआरचे अधिकारी विजय कुमार सिंह अधिकारी म्हणाले, सदर विमान १०० टक्के सुरक्षित होते. तसेच विमानाचा क्रू बऱ्यापैकी अनुभवी होता. अपघातासाठी कदाचित कमी दृश्यमानता कारणीभूत असू शकेल. तरीही डिजीसीएच्या चौकशीतून खरे कारण समोर येईल.