ajit pawar plane crash : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले आहे. अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येते व्हीएसआर एव्हिएशन या कंपनीच्या बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ या विमानाने येत होते. मात्र बारामती विमानतळावर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी विमान कोसळले ज्यामध्ये विमानातील ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झालेला व्हीएसआर एव्हिएशनचा हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी २०२३ मध्ये लिअरजेट ४५ विमान मुंबई विमातळावर कोसळले होते.
या अपघातानंतर विमानांची सखोल चौकशीची मागणी होत असतानाच दिल्ली येथील या खासगी विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिंग यांनी असा दावा केला आहे की, हे विमानाची अत्यंत चांगल्या पद्धतीने देखभाल ठेवण्यात आलेली होती आणि त्यामध्ये कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती. “विमानात कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता,” असे सिंग म्हणाले.
कंपनीकडून ७ लिअरजेट विमाने चालवली जातात. दरम्यान या भीषण अपघातानंतर उर्वरित विमानांची उड्डाणे थांबवण्याचा कंपनीचा विचार आहे का, असे विचारले असता सिंह यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.
“मी त्यांना का म्हणून ग्राउंड करावे? ते सर्व फिट विमाने आहेत. मी त्यांना का ग्राउंड करावे? तो माझा निर्णय नाही,” असे ते म्हणाले.
सिंग यांनी हेही स्पष्ट केले की लिअरजेट हे जगभरात ‘अत्यंत विश्वासार्ह विमान’ मानले जाते. “मग, आम्ही ही विमाने ग्राउंड का करावीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अमेरिकन संशोधक बिल लिअर यांनी तयार केलेले लिअरजेट हे विमान स्विस लढाऊ विमानाच्या मॉडेलवर आधारित आहे, ज्यामध्ये आठ जण प्रवास करू शकतात. १९९० मध्ये कॅनेडियन कंपनी बॉम्बार्डियरने हा ब्रँड विकत घेतला. कधीकाळी लिअरजेट हे अतिश्रीमंतांच्या लक्झरी हवाई प्रवासासाठी वापरले जात होते. मात्र, बॉम्बार्डियरने आपल्या ग्लोबल आणि चॅलेंजर या सिरिजवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याने, २०२१ मध्ये लिअरजेटचे उत्पादन अधिकृतपणे बंद करण्यात आले.
बारामती येथे बुधवारी एक मध्यम आकाराचे व्यवसायिक विमान रनवेवर उतरवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हे विमान कोसळले. या विमानात अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हे देखील होते. या सर्वांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मुंबईतून हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघाले होते. तर, बारामती येथे ८.५० मिनिटांनी पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला अन् आतील प्रवाशांचा मृत्यू झाला.
पाठक या कॅप्टन कपूर यांच्यासह फर्स्ट ऑफिसर म्हणून विमान चालवत होत्या. विमानाचे कॅप्टन हे अनुभवी वैमानिक होते आणि त्यांच्या नावावर १६ हजारांहून अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता, तर को-पायलटला देखील १५०० तासांचा अनुभव होता असे व्ही. के. सिंग यांनी सांगितले. “ते (कपूर) या प्रकारच्या विमानाबाबत खूप अनुभवी होते,” असे ते म्हणाला.
सध्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो म्हणजेच विमान अपघात अन्वेषण विभाग (AAIB) अधिकृतपणे या अपघाताची चौकशी करत आहे
यापूर्वी व्हीएसआर एव्हिएशनच्या विमानाच्या अपघाताची घटना १४ सप्टेंबर २०२३ रोजी घडली होती, तेव्हा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमध्ये लँडिंग करताना आणखी एक लिअरजेट विमान कोसळले होते.
