Rohit Pawar on Ajit Pawar accident: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. व्हिएसआर कंपनीच्या विमानाने ते मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. मात्र बारामती विमानतळावर लँडिंगपूर्वी धावपट्टीच्या सुरुवातीला विमान कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेनंतर अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही ही मागणी लावून धरली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजितदादांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अपघाताबाबत त्यांच्याकडे असलेली सविस्तर माहिती दिली. या अपघाताचा तपास करताना संपूर्ण पारदर्शकता राखली जाईल, असे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अजितदादांच्या स्मारकाबाबतचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिले. या विमान अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा कर्मचारी, क्रू मेंबर आणि सह-पायलट यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांबाबतही त्यांनी चर्चा केली.

तीन मुख्य मागण्या कोणत्या?

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना रोहित पवार यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या. पहिली मागणी म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताची सर्वंकष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करावी. दुसरी मागणी म्हणजे अजित पवार यांचा सहवास लाभलेल्या ‘देवगिरी’ बंगल्याचे संग्रहालय व स्मारकात रूपांतर करावे, तसेच राज्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना आणि महामार्गांना त्यांचे नाव द्यावे. तिसरी मागणी म्हणजे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, तसेच त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या आश्रितांना आवश्यक ती मदत करावी.

“अपघातामागे मोठ्या व्यक्तीचा हात”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत एक खळबळजनक विधान केले आहे. “या अपघातामागे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे,” असे म्हणत त्यांनी अपघाताची तांत्रिक बाबींबरोबरच गुन्हेगारी अंगानेही चौकशी करण्याची मागणी केली आहे. बुधवारी (२५ फेब्रुवारी) मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिसांनी डीजीसीएविरोधात एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्यानंतर रोहित पवार गुरुवारी (२६ फेब्रुवारी) बारामती येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचले होते. तेथे त्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी हे दावे केले होते.