Ajit Pawar Died in Plane Crash : महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या निधनाने बारामतीसह सगळा महाराष्ट्र हळहळला. दरम्यान नियतीचा एक विचित्र म्हणावा असा योगायोग समोर आला आहे. अजित पवारांनी सहा वर्षांपूर्वी जे रुग्णालय बांधलं तिथेच त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि पोस्टमॉर्टेमही तिथेच करण्यात आलं.

पुण्यश्लोक अहित्यादेवी होळकर रुग्णालय अजित पवारांनीच बांधलं होतं

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालय हे अजित पवारांनी सहा वर्षांपूर्वी बारामतीत बांधलं. बारामतीचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमाणे म्हणाले, या ठिकाणी असलेल्या ऑडिटोरियमच्या खुर्च्यांपासून प्रत्येक विभागाचं काम अजित पवार स्वतः बघायचे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय देशातल्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्यात गणलं जावं ही अजित पवार यांची इच्छा होती. आम्हाला हे कधीही वाटलं नव्हतं की अजित पवारांनी बांधलेल्या या रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केलं जाईल. अजित पवार आणि इतर सगळ्यांच्याच मृतदेहाचे भाग आम्ही गोळा करुन इथेच आणले आणि डीएनए नमुनेही एकत्र केले. आमच्यासाठी हा क्षण हेलावून टाकणाराच होता. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला भावना आवरणं कठीण झालं होतं.

सकाळी ८.५० च्या आसपास आम्हाला फोन आला आणि…

मनोज खोमणे पुढे म्ङणाले, बुधवारी साधारण ८.५० च्या आसपास आम्हाला रुग्णवाहिकेसाठी फोन आला होता. विमानतळावर एक रुग्णावाहिका होतीच. तरीही आमच्या रुग्णालयाची रुग्णवाहिका घेऊन आम्ही पोहचलो. आम्हाला आशा होती की घटनस्थळी कुठलीही अप्रिय घटना घडलेली नसेल. मात्र अजित पवारांचं अपघाती निधन झालं. आम्ही त्यांचा मृतदेह इथे आणला आणि त्यानंतर या ठिकाणी खूप गर्दी झाली.
डॉ. खोमणे म्हणाले अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातावर असलेल्या घड्याळामुळे झाली. तर विदीप जाधव यांच्या नेमप्लेटवरुन आम्ही त्यांना ओळखलं. तिसरा मृतदेह पायलच्या वेशातला होता. तर दोन महिलांचे मृतदेहही आम्ही इथे आणले होते. पोस्टमॉर्मेटची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा आम्हा सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

Ajit Pawar Death
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी जनसागर बारामतीत लोटला होता.

डॉ. राजेश उमप यांनी काय सांगितलं?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बारामतीचे आरोग्य अधीक्षक डॉ. राजेश उमप म्हणाले अजित पवारांच्या अपघातानंतर जेव्हा त्यांचं आणि विमानातल्या इतरांचं पार्थिव इथे आणण्यात आल तेव्हा आम्ही सगळेच एका तणावाखाली होतो. विमानाचा स्फोट इतका भयंकर होता की मृतदेह आगीत जळाले होते. तसंच फ्रॅक्चर्सही झाले होते. दात आणि मांडीची हाडं यावरुन डीएनचे नमुने गोळा करण्यात आले अशीही माहिती त्यांनी दिली.

२८ जानेवारीला नेमका अपघात कसा घडला?

बुधवारी सकाळी बारामतीत विमान कोसळून अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी दादांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते, नागरिकांनी बारामतीत गर्दी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नागरिकांची रीघ लागली होती. गुरुवारी सकाळी काटेवाडी येथे अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. काटेवाडी येथे दादांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही कुटुंबीयांसह काटेवाडीत अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.