महायुतीमध्ये अजित पवार यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे आगामी काळात आमचा पक्ष वेगळा विचार करू शकतो, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार (विधान परिषद) अमोल मिटकरी यांनी केलं आहे. तसेच, “भविष्यात अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र आणण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न करेन”, असेही मिटकरी म्हणाले. “हे दोन नेते एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणाची दिशा आणि दशा नक्कीच बदलेल”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अमोल मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याबाबतचा निर्णय हा सर्वार्थाने वरिष्ठांचा असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज म्हणून मी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहत आलो आहे. तर अजित पवार हे माझे राजकारणातले आदर्श व्यक्ती आहेत. समाजकारणात मी प्रकाश आंबेडकरांना आदर्श मानतो. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार तर आहेतच तसेच त्यांचा पक्ष देखील राज्यात मोठा आहे. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर हे दोघेही शिव-शाहू-फुले आणि आंबेडकरांचे वारसदार आहेत. अजित पवार देखील त्यांच्याच विचाराने काम करणारे नेते आहेत. ही जोडी महाराष्ट्रात एकत्र आली तर यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी दुसरा कुठलाही नसेल. अर्थातच ते अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर अवलंबून आहे. मात्र या दोघांनी एकत्र यावं अशी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे.”

मिटकरी म्हणाले, “आंबेडकरी चळवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आली तर महाराष्ट्राची दिशा आणि पुढचं राजकारण फार वेगळं असेल. प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्यासाठी महायुतीने प्रयत्न केले होते. तर महाविकास आघाडीने त्यांना केवळ त्रासच दिला. मविआमधील नेते संजय राऊत, नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना त्रास दिला. शेवटी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीपासून दूर जायला भाग पाडलं. मविआने त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी तो हाणून पाडला. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील बुलंद नेते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र आले तर राज्यात एक वेगळं चित्र निर्माण होईल.”

हे ही वाचा >> “छगन भुजबळ दंगल घडवणार”, मनोज जरांगेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, “ते सरकारमध्ये बसून…”

अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी मिटकरी यांना विचारण्यात आलं की अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र आणण्यासाठी किंवा यांच्यात समन्वय साधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? यावर मिटकरी म्हणाले, “मी या दोन मोठ्या नेत्यांना एकत्र आणण्याइतका मोठा नाही. हे सगळं वरिष्ठ पातळीवर होतं. परंतु, एक दुवा म्हणून काम करण्यास हरकत नाही. मला माझ्या पक्षाने सांगितलं तर मी अनेकदा प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊ शकतो. मी त्यांच्याकडे केवळ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा म्हणून पाहत नाही. तर ते बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे आणि मी त्यांच्याचरणी नेहमीच नतमस्तक होतो. मी त्यांना नेहमी भेटत असतो.