शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. पक्षाअंतर्गत झालेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यात सत्तांतर घडून पाच महिन्यांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या मनातले मुख्यमंत्री अद्याप उद्धव ठाकरेच आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री’ असा केला. पण यानंतर अजित पवारांनी लगेच आपली चूक दुरुस्त केली आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला. त्यामुळे अजित पवारांच्या मनातले मुख्यमंत्री अद्याप उद्धव ठाकरेच असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत.

हेही वाचा- महाराष्ट्र तोडण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न होतोय; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता भाजपावर हल्ला

खरं तर, मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटातील काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विविध आक्षेपार्ह विधानं केली आहेत. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील सीमावादही उफाळून निघाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवार) महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

हेही वाचा- MCD exit poll: ‘आप’ली दिल्ली! महापालिका निवडणुकीत ‘आप’चा वरचष्मा; भाजपाला धक्का, काँग्रेस नगण्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून शिवाजी महाराजांबद्दल केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने १७ डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, याबाबतची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच पत्रकार परिषदेत अजित पवारांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘मुख्यमंत्री’ असा केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar pronounce uddhav thackeray as chief minister in press conference rmm
First published on: 05-12-2022 at 20:06 IST