Ajit Pawar Ladki Bahin Yojana Effect Bihar Elections: बिहारमध्ये दोन टप्प्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल असे चित्र आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार सध्या भाजपा ९५ विधानसभा जागांवरील आघाडीसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल ८४ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये अजित पवार म्हणाले की, “बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळवलेला विजय हा खरोखरच ऐतिहासिक असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे.”

“बिहारमध्ये एनडीए सरकारने समाजकल्याणाच्या विविध क्रांतिकारी आणि जनतेच्या हिताच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. विशेषतः राज्यातील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने दिलेला पाठिंबा हा या विजयात महत्त्वाचा आधार आहे. बिहारच्या जनतेने डबल इंजिन सरकारच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा भक्कम विश्वास प्रकट करून भरघोस बहुमताने पाठिंबा दिला आहे. या अभूतपूर्व विजयाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे मी मनापासून अभिनंदन करतो”, असे अजित पवार पुढे म्हणाले.

आपल्या पोस्टच्या शेवटी अजित पवार म्हणाले की, “हा विजय केवळ संख्याबळाचा नसून तेथील सुशासन आणि सामाजिक न्यायच्या धोरणांचा विजय आहे. हा एनडीएच्या एकजुटीचा आणि स्थिर नेतृत्वाचा विजय आहे. या विजयामुळे बिहारच्या सर्वांगीण विकासाला आणखी गती मिळेल आणि राज्याला नवी दिशा मिळेल. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये बिहार आणखी वेगाने प्रगती करेल, असा विश्वास आहे.”

दरम्यान, प्रमुख विरोधी पक्ष आरजेडी २४ जागांवर तर एलजेपी (रामविलास) २० जागांवर आघाडीवर आहे. प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष आपले खाते उघडू शकला नाही, तर काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे.