Ajit Pawar On MNS Chief Raj Thackeray Devendra Fadnavis alleged Meeting : राज्यात आगामी काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहेत. मात्र या चर्चेदरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याची बाब समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे येथील ताज लॅन्ड्स एंड या हॉटेलमध्ये राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“वेगवेगळ्या सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात आणि चर्चा करत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. तो आदर्श स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सगळ्यांना शिकवला आहे. त्याच रस्त्याने बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

“अनेकदा आम्ही देखील सत्ताधारी पक्षात असताना विरोधी पक्षातील नेत्यांनी वेळ मागितली तर देतो किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांची वेळ मागितली तर त्यांनी देखील आम्हाला दिली आहे. यात खूप काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. काही प्रश्न असतात, काही समस्या असतात ज्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची असते,” असे अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र उतरणार अशा चर्चा सुरू आहेत, यात राज ठाकरे व फडणवीस यांची भेट झाल्याचे दावे केले जात आहेत. यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. दरम्यान वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे भेटले का? त्यांच्यात काही चर्चा झाली की नाही? याबाबत अधिकृत माहिती सध्या मिळालेली नाही. मात्र, दोन्ही नेते एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये पोहोचणं हा योगायोग आहे की राजकीय भेट आहे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.