राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची बाजू मांडणाऱ्या चित्रपटात नथुरामाची भूमिका केल्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्याबद्दल नाराजीचा सूर लावल्यानंतर कलावंत म्हणून एखादी भूमिका करणे गैर नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केली होती. तसेच अमोल कोल्हे यांनीही हा चित्रपट केला तेव्हा सक्रीय राजकारणात नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं आहे. यावरुन बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला अमोल कोल्हेंचा फोन आला होता. २०१९च्या निवडणुकीआधी अमोल कोल्हेंसोबत मीच चर्चा करुन त्यांना शरद पवारांकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतर अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. मी कलाक्षेत्रात पहिल्यापासून काम करत आहे असे अमोल कोल्हेंनी सांगितले होते. २०१७ ला एखाद्या कलावंताने कुठल्याही पक्षासोबत संबंध नसताना करार केलेला असेल तर अनेकांच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्या आहेत. २०१९ मध्ये एका पक्षाचे सदस्य झाल्यानंतरची भूमिका त्यांनी लोकांच्या समोर ठेवली आहे,” असे अजित पवार म्हणाले.

“जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटले ते त्यांना विचारा मी माझे मत सांगितले आहे. शरद पवारांनी त्यांचे मत सांगितले आहे. प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात. अमोल कोल्हेंसोबत बोलल्यानंतर त्यांनी मी कलावंत म्हणून ती संधी स्विकारली असे सांगितले. पुरोगामी विचार अमोल कोल्हे यांनी स्वीकारून ते राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत,” असे अजित पवार यांनी म्हटले.

नेमकं प्रकरण काय?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन हा सर्व वाद सुरु आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधील वादामुळे हा चित्रपट रखडला होता. पण त्यांच्यातील वाद समन्वयाने मिटल्यामुळे हा चित्रपट आता पाच वर्षांनी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमोल कोल्हेंची भूमिका

“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction to the role of nathuram godse of amol kolhe abn
First published on: 22-01-2022 at 13:48 IST