मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. पोलिसांनी शेलार यांचा जबाब नोंदवून जामीन मंजूर केला. या दमदाटीला न घाबरता राज्य सरकार विरोधात कडवा संघर्ष करण्याचा इशारा शेलार यांनी दिला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे.

“त्यांच्याकडून राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या लोकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आमचा काही संबंध नाही असे सांगितले जाते. मुंबईच्या महापौरांबद्दल त्यांनी काय वक्तव्य केले आहे ते सर्वांनी बघितले आहे. महिलांचा आदर करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आपण शिवाजी महाराजांच्या काळाचा उल्लेख करतो आणि असे असताना महापौरांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेच राजकारण सुरु झाले. हे असे नाही. प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावे. एसटी संपाच्यावेळी काही लोक काय शब्द वापरत होते ते आपण पाहिले आहे. दुसऱ्यांना पण बोलता येत पण ते तारतम्या ठेवून शब्द वापरतात. प्रत्येकाने लोकांच्या समोर जात असताना थोडासा आपल्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. ज्यामधून कोणती नविन समस्या निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य कोणीच करु नये,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

“माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका..”; महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र

वरळीतील गँस सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या बाळासह कुटुंबियांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू होण्यास उशीर झाला व महापौरांनीही भेट देण्यास विलंब केला. त्यामुळे त्या कुठे होत्या, यासंदर्भातील वक्तव्य केल्याने शेलार यांच्याविरोधात मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

“महापालिका यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्या वरळीतील मुलाच्या मृत्यूचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारला, सागरी किनारा मार्गातील भ्रष्टाचार उघड केला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबरोबरच्या बैठकीतील ठाकरे सरकारचा महाराष्ट्र विरोधातील छुपा कार्यक्रम उघड केला, म्हणून खोटे गुन्हे दाखल करुन मला घाबरवण्याचा प्रयत्न केला, तरी जोरदार संघर्ष करीन,” असे शेलार यांनी म्हटले होते.