नांदेड: मराठवाड्यातील दुसऱ्या महसूल आयुक्तालयाच्या विषयाचा जिल्ह्यातील भाजपासह काँग्रेस पक्षाच्याही आजी-माजी लोकप्रतिनिधींना विसर पडलेला असताना काँग्रेस पक्षातील काही तरुण कार्यकर्त्यांनी वरील प्रलंबित विषयाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले आहे. पण मुखेड तालुक्यात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात पवार यांनी आयुक्तालय सोडून इतर मागण्यांच्या बाबतीत आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह जिल्हावासीयांना आश्वस्त केले.

मुखेड तालुक्यातील नियोजित पक्षप्रवेश सोहळा आणि देगलूर तालुक्याच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री पवार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक रविवारी नांदेडमध्ये आले होते. सकाळी येथे दाखल झाल्यानंतर पवार यांनी माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि नंतर ते मुखेड तालुक्याकडे रवाना झाले.

या भेटीदरम्यान काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, संदीपकुमार देशमुख बारडकर आणि हनुमंत राजेगोरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना नांदेड येथे मंजूर असलेल्या विभागीय आयुक्तालयाच्या निर्मितीसंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. मागील काही आठवड्यात पवार यांची याच विषयावर एका शिष्टमंडळाने मुंबईत भेट घेतली होेती. नंतर माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनीही एका भेटीदरम्यान आयुक्तालयाच्या मागणीकडे त्यांचे लक्ष वेधले होते.

नांदेडच्या आयुक्तालयाचा विषय सीमावादासारखा झाला आहे, असे अजब वक्तव्य काही दिवसांपूर्वी करणाऱ्या पवार यांनी रविवारी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत हा विषय महत्त्वपूर्ण असून त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेस व इतर पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात खतगावकर-चिखलीकर प्रभृतींनी पवार यांच्यासमोर मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पासह अन्य प्रलंबित मागण्या मांडल्या. या कार्यक्रमाचा समारोप करताना पवार यांनी लेंडी प्रकल्प, मनार प्रकल्पाच्या कालव्यावर अस्तरीकरणाचे काम करणे या व इतर काही मागण्यांवर सर्वांनाच आश्वस्त केले; पण मागील महिनाभरात आयुक्तालयाची मागणी सतत मांडल्यानंतरही त्यावर पवार यांनी मतप्रदर्शन केले नाही.

मागील काही महिन्यांत पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने मी तिसऱ्यांदा नांदेडला आलो असल्याचे नमूद करून पक्षाचा विस्तार अशाच पद्धतीने होत गेला, तर नांदेड जिल्हा ‘राष्ट्रवादीमय’ होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. पक्षात कोणी नव्याने आले, तरी आधीपासून काम करणाऱ्यावर अन्याय होणार नाही. सर्वांनी सभासद नोंदणी वाढविण्याकडे लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळावरील स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना पवार यांनी मागील दौऱ्यात कडक शब्दांत दटावले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी त्यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कर्डिले आणि पोलीस प्रमुख अबिनाशकुमार, जि.प.च्या सीईओ मेघना कावली यांनी पवार यांचे स्वागत ग्रंथभेटीने केले. पण आ.चिखलीकर व इतर उपस्थितांनी गुलाबपुष्प देऊन उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.