राजकारण सोडण्याचं काम सुरुवातीच्या काळात माझ्याकडून घडू शकलं असतं पण आता ते शक्य नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राजकारणापासून दूर जाण्याच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “राजकारण सोडण्याचं काम सुरुवातीच्या काळात माझ्याकडून घडू शकलं असतं पण आता आमचं आणि बारामतीचं घट्ट असं नातं बनलं आहे, त्यामुळे लोक आम्हाला सोडतील असे वाटत नाही. अजित पवार खासदार, आमदार झाल्यानंतर ज्या तरुणांचा जन्म झाला त्यांचा मला पाठींबा असल्याचे पाहून मी थक्क झालो. निवडणूका या तरुणांच्या आणि महिलांच्या पाठींब्यावरच जिंकल्या जातात.”

पवार पुढे म्हणाले, “मी फुशारक्या मारत नाही, पण मला विश्वास आहे की कमीत कमी १ लाख मतांनी मी निवडून येईल. कारण, लोकसभेच्यावेळी सुप्रियाचा एक लाखांच्यावर मतांनी विजय झाला होता. बारामतीत पाऊल ठेवेपर्यंत मला वाटलं नव्हतं की, मला एवढा प्रतिसाद मिळेल.” दरम्यान, भाजापाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हते. माझ्या किंवा जयंत पाटलांच्यातरी संपर्कात नव्हते असेही यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केले.

काही जागांच्या तिढ्याबाबत बोलताना ते म्हणाले, पिंपरीच्या जागेवर आण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांना एबी फॉर्म मिळाला असून त्यांनी अर्जही दाखल केला आहे. कोथरुडचा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीकडे येतो पण या जागा आघाडीतील पक्षांनी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामध्ये राजू शेट्टींनी विश्वंभर चौधरी यांचे नाव सुचवले होते तर मनसेने किशोर शिंदेंचे नाव सुचवले आहे. या जागेवर आघाडीतील सर्व पक्षांच्या संमतीने पाठींबा जाहीर केला जाणार आहे. याबाबत सध्या छाननी सुरु आहे त्यानंतर आघाडीचा कोणता उमेदवार असेल हे स्पष्ट होईल. राष्ट्रवादीची भुमिका नुसत्या जास्त जागा घ्यायाच नाहीतर तर जास्तीत जास्त आघाडीचे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे ही आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.