scorecardresearch

“मी सकाळी कामाला सुरुवात करतो, काहीजण टाकायला…” अजित पवारांचा रोख कुणाकडे?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

ajit pawar
कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपाला दिलेल्या पाठिंब्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया (संग्रहित छायाचित्र)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात न आलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील स्थगितीवरून राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन ६ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार का झालेला नाही? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, या सभेत अजित पवार म्हणाले की, “आमदार प्राजक्त तनपुरे आणि माझे इतर सहकारी यांनी सांगितलं की, अजित पवार सकाळी-सकाळी लवकर कामाला सुरुवात करतात. पण त्यात काय वाईट आहे? काहीजण सकाळी सकाळी टाकायला सुरुवात करतात आणि मी कामाला सुरुवात करतो. हे वाईट आहे का? उगाच चंद्रावर जाऊन वाटोळं करण्यापेक्षा लोकांची कामं केलेली बरी. दरम्यान, अजित पवार हे बोलत असताना त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता यावरून चर्चा सुरू आहेत.”

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करून पक्षापासून वेगळी चूल मांडली. या आमदारांनी वेगळा गट स्थापन करून भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार सुरू केला. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी १८ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु अद्याप या सरकारचा पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होणं बाकी आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

“आमदारांनी नवीन सूट शिवून घेतले पण…”

मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने अनेक आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवून सोबत घेतलं होतं. यापैकी बऱ्याच जणांनी मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी नवीन सूट देखील शिवले, नवस केले, अभिषेक केला पण त्यांना मंत्रीपद अद्याप मिळालं नाही.

हे ही वाचा >> “४० आमदारांनी सूट शिवून घेतले, नवस केले, पण…” अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

“शिंदे-फडणविसांचं स्थगिती सरकार”

पवार म्हणाले, “राज्यातलं हे सरकार घटनाबाह्य आहेच तसेच हे स्थगिती सरकार देखील आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या अनेक प्रकल्पांना या सरकारने स्थगिती दिली आहे. तसेच बरेच मोठे प्रकल्प या सरकारमुळे आपण गमावले. राज्यातले काही प्रकल्प इतर राज्यात गेले. माझ्या जिल्ह्यात येणारा १.५ लाख कोटी ते २ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेला. यामुळे २ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 16:21 IST
ताज्या बातम्या