राष्ट्रवादी काँग्रेस अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीचे सरकार टीकवण्याचा प्रयत्न करेल असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का? अजित पवार म्हणाले, “आताच्या घडीला…”

महाविकास आघाडीचं सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा आहे, असं अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. “राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत हे सरकार कसं टिकेल याबद्दल काम करत आहे,” असंही अजित पवार म्हणाले. दुपारी माझं मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं असून आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असं आम्ही त्यांना कवळल्याची माहिती अजित पवारांनी पत्राकांशी बोलताना दिली. तसेच आदित्य ठाकरे यांच्याशीही एका वेगळ्या कामाच्यासंदर्भातून चर्चा झाली तेव्हा राष्ट्रवादी पाठीशी असल्याचं त्यांना कळवल्यांचही अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरेंना पाठिंबा यापेक्षा दुसरी भूमिका राष्ट्रवादीची नाही, असंही अजित पवार म्हणाले.

जास्त अधिकार वाणीने शिवसेनेचे नेते त्यासंदर्भात सांगतील, असंही अजित पवारांनी शिवसेनेसंदर्भातील प्रश्नांवर सविस्तर उत्तर देण्याचं टाळताना सांगितलं. शिवसेनेचे काही आमदार परत आलेत त्यांनी वेगळी भूमिका मांडलीय, असंही अजित पवारांनी अधोरेखित केलं. तिकडचे आमदार आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून पहायला मिळतायत. त्यांना मुख्यमंत्र्यांनीही परत येण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टीकवण्याची आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांना मागील दोन दिवसांमध्ये ४६ आमदारांनी समर्थन दर्शवलं आहे. शिंदे हे मंगळवारी काही बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेले. त्यानंतर बुधवारी पहाटे ते बंडखोर आमदारांसोबत गुवहाटीमध्ये दाखल झाले. सध्या हे सर्व आमदार गुवहाटीमध्येच असून ठाकरे सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळपासून मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठकी पार पडल्यानंतर सायंकाळी शरद पवारांनी यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली.