रोहित पवार यांच्या वाटचालीतही दिले योगदान
कर्जत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यासाठी भौगोलिकदृष्ट्या कर्जत हा सर्वात जवळचा तालुका. त्यामुळेच कर्जतच्या प्रश्नांकडे अजित पवार यांनी नेहमीच विशेष लक्ष दिले. बंद पडलेला जगदंबा साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांसाठी त्यांनी मदतीचा हात दिला. कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या राजकीय वाटचालीतही त्यांचे योगदान निर्णायक ठरले.
अजित पवार यांचे कर्जत तालुक्याशी नाते केवळ राजकीय नव्हते तर ते जिव्हाळ्याचे, आपुलकीचे विकासाभिमुख होते. बारामतीसारखाच कर्जत तालुका व्हावा याचे स्वप्न आमदार रोहित पवार यांनी पाहिले, ते काका अजित पवार यांच्या पाठिंबामुळेच. महाविकास आघाडीचे सरकार असताना कर्जत-जामखेड मतदारसंघाला अजित पवार यांनी सर्वात जास्त निधी दिल्याचा आरोप त्यावेळी झाला होता.
कर्जतमधील जगदंबा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना दूरवरच्या कारखान्यांकडे जावे लागत होते. ही परिस्थिती पाहून अजित पवार यांनी पुढाकार घेत जगदंबा कारखाना गोयंकांच्या नावावर खरेदी करून त्या जागी अत्याधुनिक आंबालिका साखर कारखाना उभारला. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला शाश्वत न्याय मिळाला. कारखान्याच्या माध्यमातून शेतीपूरक उपक्रम, शेतकरी मेळावे, उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन असे विविध उपक्रम सातत्याने राबवले गेले. बारडगाव सुद्रिक परिसरात रस्त्यांची जाळे उभे राहिले. कारखान्याशी संलग्न माध्यमिक विद्यालयासाठी इमारत उभारण्यातही त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता.
कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार कुटुंबियातील एक व्यक्ती उभी राहणार असे अजित पवार कार्यकर्त्यांशी बोलताना सांगत. त्यांनी मतदारसंघासाठी स्वतःची तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी चाचपणीही केली होती. नंतर रोहित पवार यांना मतदार संघातून लढवण्याची संधी दिली. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात रोहित पवारांना यश मिळवण्यात अजित पवारांची रणनीती, अनुभव, पाठबळ महत्त्वाचे ठरले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पवार कुटुंब वेगवेगळ्या पक्षात असतानाही अजित पवार यांनी मतदारसंघात थेट प्रचार न केल्याचा लाभ रोहित पवार यांना झाला आणि ते विजयी झाले. निकालानंतर काराडीतील प्रीतीसंगम येथे झालेली अजित पवार व रोहित पवार यांची भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली. ‘बेट्या मी मतदारसंघात आलो नाही म्हणून तुझा विजय झाला’ हे अजित पवार यांचे शब्द आज अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहेत. कर्जतमधील एसटी बस स्थानकासाठी निधी, एसटी आगिर उभारण्याचे प्रयत्न, क्रीडा संकुलासाठी दिलेले पाठबळ हे अजित पवार यांच्या कर्जतवरील प्रेमाचे ठळक उदाहरण. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग आज हळहळ व्यक्त करत होता.
