राज्यात भोंग्यांवरून राजकारण चांगलंच तापलंय. भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रामक झाली आहे, अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भोंग्यांबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सर्वांना सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळण्याचं आवाहन केलंय. तसेच मंदिर आणि मशिदीवर भोंग्यांसाठी प्रशासनाची परवानगी असणं आवश्यक असल्याचं म्हटलंय.
“आपल्या राज्यामध्ये शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार मानले जातात. आपण रोज त्यांच्या विचारांचं स्मरण करतो. परंतु त्यांच्या विचारांचं स्मरण करताना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्या. राज्यातील धार्मिक स्थळांनी भोंगे वापरण्याबद्दल परवानगी घ्यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळावी, कोणीही लाऊडस्पीकरचा आवाज वाढवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच ज्यांनी भोंगे वापरण्यासाठी परवानगी घेतली नाही, त्यांनी ती घ्यावी. कोणाच्याही दबावाला आणि भावनिक आवाहनाला बळी न पडता सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावं,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
“भोंगे वापरण्यासाठी परवानगी न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. परंतु परवानगी लगेच एक-दोन दिवसांत मिळणार नाही, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ देण्यात येईल. शिवाय सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सर्वांना पाळावाच लागेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा एका विशेष समुदायासाठी नाही. त्यामुळे तो आदेश फक्त एका समुदायाने नाही, तर सर्व धर्मांनी पाळणं गरजेचं आहे,” असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, “राज ठाकरे यांना काही अटी घालून देत औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या अटींचं उल्लंघन झाल्याचं कळतंय. त्याबद्दल पोलीस त्यांचं काम करत आहेत. कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये, तसेच कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम देऊ नये. इथे हुकुमशाही नाही, काय अल्टिमेटम द्यायचे असतील तर ते तुमच्या घरात द्या, बाकी कोर्टाचे आदेश सर्वांसाठी सारखे आहेत, मग तो सर्वसामान्य नागरिक असेल अथवा अजित पवार, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे,” अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली.
तसेच दिल्लीतील जहांगिरपुरीत झालेल्या दंगलीनंतर युपीमध्ये योगी सरकारने गोरखपूरमध्ये गोरखमठावरील भोंगे उतरवले. त्यानंतर राज्यातील इतर काही ठिकाणी आवाहन केल्यानंतर मंदिर आणि मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आले. तिथे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, असंही अजित पवार म्हणाले.