Parth Pawar enter Rajya Sabha: अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल, या जागेवर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यावर विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली जाईल, त्यानंतर सायंकाळी त्यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी होईल.

पार्थ पवार यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना विजय मिळवता आला नव्हता. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता ते राज्यसभेच्या माध्यमातून आपली राजकीय कारकिर्द सुरू करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर संधी दिल्यास ते पक्षात नेतृत्व बदलाचे संकेत ठरतील.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यात होणार असल्याने अर्थखाते तात्पुरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. त्यानंतर हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पक्षाची दिशा ठरविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला, अशी माहिती सुत्रांनी दिली.

अजित पवार यांच्या मृत्यूपश्चात, राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून गुरुवारी विलीनीकरणाच्या विषयाला वाचा फोडण्यात आल्यानंतर नेतृत्वाचा प्रश्न निकालात निघेल, असे बोलले जात होते. मात्र, याला राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार) एका गटासह भाजपाचाही विरोध असल्याचे बोलले जाते. अजित पवार यांच्या पक्षावर सुनेत्रा पवार यांचा वरचष्मा राहील या दृष्टीने भाजपाने सारी व्यूहरचना केली आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविल्याने भाजपला राष्ट्रवादीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल, हे त्यामागचे गणित आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चा केली. सुनेत्रा पवार यांची नेतेपदी निवड करून त्यांचा सरकारमध्ये समावेश करण्यास फडणवीस यांनी होकार दिला आहे.