बीड – अजित पवारांच्या सभा, त्यांनी केलेली वक्तव्ये आणि त्यामुळे जन्माला आलेले वाद हे आता तसे नवे नाहीत. पण चुकून काही वेळा काही शब्द निघून जातात आणि अजित पवार त्याचे खापर पुन्हा माध्यमांवर फोडतात. त्याचे झाले असे की, अजित दादांनी बीडमध्ये सभा घेतली आणि सहज बोलून गेले, ‘ रामकृष्ण हरी’ भर सभेत लोकांसमोर उभा राहिलेला पर्याय होता ‘ वाजवा तुतारी’. खालून आवाज आला आणि मग दादांना कळाले आपण काय बोलून बसलो. ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी ’ हे घोषवाक्य विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चेत आले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारी ते मराठवाड्यात तसे रुजलेले. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये तर ते अधिक खोलवर गेलेले. नेमके अंबाजोगाईत अजित पवार रामकृष्ण हरी म्हणाले आणि त्यांना पुन्हा पुढे सारवासारव करावी लागली.
नगर परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी रात्री जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी “राम कृष्ण हरी” हा शब्द उच्चारला. यावेळी उपस्थित पैकी काहींनी वाजवा तुतारी असे म्हणत प्रतिसाद देखील दिला. त्यानंतर आयोजकांकडून एकाने दादांना एक चिठ्ठी लिहून देत या रामकृष्ण हरीचा वेगळा अर्थ निघू शकतो असा निरोप दिला गेला. त्यानंतर पवारांनी सारवासारव करत आपण संतांच्या भूमितील आहोत त्यामुळे एकमेकांना भेटलो तर राम कृष्ण हरी म्हणतो. तुमच्या मनातील शंका दूर करा. याचा कृपया वेगळा अर्थ लावू नका असे स्पष्टीकरण दिले.
पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्याचे कौतुक करत संदीप क्षीरसागर यांनी तसे फलक बीडमध्ये लावलेले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या सभेत “राम कृष्ण हरी” कोणासाठी म्हटले असावे याची चर्चा जिल्हाभरात होऊ लागली आहे.
या नगरपालिकेच्या निवडणुकीत मत दिले तर निधी देऊ असेही अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे वाद झाला. जर मतदान केले नाही तर निधी न देण्याच्या त्यांच्या या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांना सारवा सारव करावी लागली. या पूर्वीही अजित पवार यांच्या जाहीर भाषणातील वक्तव्ये त्यानंतर त्यांना करावे लागले आत्मक्लेश आंदोलन यांचीही आठवण आता बीडमध्ये काढली जात आहे. अजित पवार बीडचे पालकमंत्री असल्याने बीड जिल्ह्यात ‘ रामकृष्ण हरी ’ आवर्जून म्हणून दाखवणारे कार्यकर्तेही आहेत. या दोन शब्दात आम्ही शरद पवार यांचे समर्थक, असाही अर्थ काढला जातो.
