राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार व देवेंद्र फडणवीसांच्या झालेल्या शपथविधीबाबत केलेला गौप्यस्फोट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवारांनी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील नेतेमंडळींनीही प्रतिक्रिया दिली असून आता खुद्द अजित पवारांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यामध्ये पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवारांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

“मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही”, असं जयंत पाटील म्हणाले होते. यानंतर या विधानावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

पहाटेचा शपथविधी आणि राजकारण!

२०१९ सालच्या राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राजकीय तिढा निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून फाटल्यामुळे युतीचं सरकार पुन्हा येणार नसल्याचं दिसू लागलं होतं. त्याचवेळी अचानक अजित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांसमवेत शपथविधी उरकल्याचा राजकीय भूकंप झाला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी त्यानंतर तीन दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडींनंतर राजीनामा दिला. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनीही राजीनामा दिला आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचं सरकार ठरलेलं फडणवीस सरकार ८० दिवसांत कोसळलं. त्यानंतर अजित पवारांच्या या कृतीचं गूढ अद्यापपर्यंत कायम आहे. दोन्ही बाजूंनी त्यावर कोणतंही सविस्तर कारण देण्यात आलेलं नाही.

“शरद पवार भाजपाबरोबर आहेत म्हणणं…”, संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले खडेबोल; म्हणाले…

अजित पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आलं असून हा सगळा प्रकार शरद पवारांच्या खेळीचा भाग असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यावर पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. “त्यावेळी मी स्वत: म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

“राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठीच पहाटेचा शपथविधी”, शरद पवारांचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी केला गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीसांना कोण अडकवणार होतं?

देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी “मला अडकवण्याचं टार्गेट तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आलं होतं”, असा आरोप केला होता. त्यासंदर्भात आशिष शेलार यांनी संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इतर कोण काय म्हणतंय, त्यावर उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाही. कुणीही कोड्यात बोलू नये. स्पष्ट भूमिका घेतली, तर त्यावर लोकांना नीट काहीतरी कळेल. मी उपमुख्यमंत्री असताना अशा प्रकारची कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झालेली नाही”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.