Ajit Pawar महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगतो आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. तर महायुतीत भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार ) असे तीन पक्ष आहेत. महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना तिकिट दिलं आहे. नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर दाऊदशी व्यवहार केल्याचे आरोप केले होते. आता अजित पवारांनी ( Ajit Pawar ) मात्र नवाब मलिक दाऊदचे साथीदार असू शकत नाहीत असं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचे आरोप काय होते?
नवाब मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ ३० लाख रुपयांना विकत घेतली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी एलबीएस रोडवर जागा विकत घेतली आहे. आर. आर. पाटील हे एकदा एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता. यात आर. आर. पाटील यांचा काही दोष नव्हता पण याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली असं देवेंद्र फडवणीस यांनी आरोप केला होता.सलीम पटेल हा हसीना पारकर यांचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती. हे सगळे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या प्रकरणात नवाब मलिक यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. आता अजित पवारांनी मात्र नवाब मलिक दाऊदला साथ देऊ शकत नाहीत म्हटलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आजवर अनेक नेत्यांवर आरोप झाले आहेत. तसंच नवाब मलिक यांच्यावर जे आरोप झाले ते सिद्ध झालेले नाहीत. तसंच नवाब मलिक यांना शिक्षाही झाली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक नेत्यांवर आरोप झाले आहेत. ज्यांच्या विरोधातले आरोप सिद्ध झाले ते राजकारणातून बाजूला झाले. ज्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत असे नेते मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले, वेगवेगळ्या पदांवर गेले हे आपण पाहिलं आहेच असंही अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.
हे पण वाचा- नवाब मलिक वि. अबू आझमी: मानखूर्दमध्ये दोन मुस्लीम नेत्यांच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला लाभ मिळणार?
नवाब मलिक आमचे उमेदवार आहेत, प्रचार करणारच
नवाब मलिक हे आमचे उमेदवार आहेत आम्ही त्यांचा प्रचार करणारच असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी आहे. मात्र महायुतीत असं पाच जागांवर झालं आहे तसंच महाविकास आघाडीतही अशा गोष्टी घडल्या आहेत असंही अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी स्पष्ट केलं.
मी नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो
अजित पवार म्हणाले, हे बघा मी नवाब मलिक यांना मागची ३५ वर्षे ओळखतो. दाऊदची साथ ते देऊ शकत नाहीत. याआधी काही सेलिब्रिटींवरही दाऊदची साथ दिल्याचा आरोप झाला आहे. आरोप झाले आहेत, ते सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी ठरवणं हे काही योग्य नाही. असंही अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.