पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली. मात्र, ईडीच्या या कारवाईवरून विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ही कारवाई सुडभावनेने केली जात असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. राज्याचे विरोधीत पक्ष नेते अजित पवार यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यंत्रणांनी सुडभावनेने कोणीतीही कारवाई करू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

कोणत्याही यंत्रणेने सूडबुद्धीनं कारवाई करू नये. कारण दिवस बदलत असतात. गेल्या काही दिवसांत अनेकांना ईडीच्या नोटीस आल्यात. अशा प्रकारच्या कारवाईची चर्चाही काही दिवासांपासून सूरू होती. माझं यंत्रणांना एवढंच सांगणं आहे, की त्यांना सुडभावनेने कोणीतीही कारवाई करू नये, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – “शिवसेना संपत आलेला पक्ष”, भाजपा अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

उद्धव ठाकरेंकडून ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊतांवरील कारवाई सुडबुद्धीने होत असल्याचे म्हटले आहे. “विरोधात कोणी बोलला तर त्याला अडकवायचं असं सुरु आहे. बऱ्या बोलाने शरण आले तर ठीक, नाहीतर कारवाई केली जात आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्याचीलच एका स्तंभाला आता अटक झाली आहे. राजकारणाची घृणा वाटायला लागली आहे. राजकारणात दिलदारपणा पाहिजे. इतर पक्ष संपवण्याची हौस असेल तर जनतेसमोर जायला हवे. तुमचे विचार मांडा. विरोधक त्यांचे विचार मांडतील. नंतर जनतेला निर्णय घेता येईल,” असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – “मी तुमच्यासोबत”, उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांच्या कुटुंबाला शब्द; निवासस्थानी जाऊन घेतली भेट

संजय राऊतांनी ईडीकडून अटक

काल संजय राऊतांच्या घरी सकाळी ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी नऊ तासापेक्षा अधिक काळ त्यांची चौकशी झाली होती. अखेर ईडीने त्यांना ताब्यात घेतले होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही चौकशी सुरू होती. या प्रकरणात मनीलॉर्डिंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे.