scorecardresearch

Video : ..आणि वाद टाळण्यासाठी अजित पवारांनी गुरुज्योत सिंग यांना म्यानातून तलवार काढूच दिली नाही; डोक्याला मारला हात!

तलवार म्यानातून बाहेर काढणाऱ्या गुरुज्योत सिंग यांना अजित पवारांनी लागलीच थांबवलं आणि डोक्याला हात मारला!

ajit pawar sward video gurujyot singh
अजित पवार यांनी डोक्याला मारला हात!

गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय कार्यक्रमांमध्ये मोठ्या नेत्यांना तलवारी भेट देणं आणि त्यांनी त्या तलवारी म्यानातून काढून उंचावून दाखवणं हे प्रकार सामान्य झाल्याइतके नियमितपणे घडू लागले आहेत. त्यावरून प्रसंगी वाद देखील ओढवले असून याचसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पाडवा मेळाव्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे म्यानातून तलवार काढून दाखवणं वादाला आमंत्रण देण्यासाठी कारण ठरत असल्याचं गेल्या काही दिवसांत घडलेल्या प्रकरणांवरून समोर आलं आहे. त्यामुळेच की काय, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क भेट मिळालेली तलवार म्यानातून काढायला नकार दिला! या प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

नेमकं झालं काय?

गुरुज्योत सिंग आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी स्टेजवर अजित पवारांच्या शेजारी येताच गुरुज्योत सिंग यांनी अजित पवारांना भेट म्हणून द्यायला आणलेली तलवार पुढे केली. अजित पवारांनी समोर आलेली भेट म्हणून तलवार हातात घेत तिचा स्वीकार देखील केला, पण पुढे घडू पाहात असलेल्या प्रसंगामुळे अजित पवार लागलीच सतर्क झाले आणि त्यांनी गुरुज्योत सिंग यांना तिथल्या तिथेच अडवलं!

..आणि अजित पवारांनी डोक्याला हात मारला!

गुरुज्योत सिंग यांनी अजित पवारांच्या हातात तलवार देऊन ती म्यानातून बाहेर काढण्याची तयारी केली होती. त्यांनी तलवारीच्या मुठीला हात घालताच अजित पवारांनी लागलीच सतर्क होत गुरुज्योत सिंग यांना आवर घातला. डोक्याला हात मारत त्यांनी गुरुज्योत सिंग यांना कानात काहीतरी सांगितलं आणि पुढचा प्रसंग टाळला.

तलवारीमुळे अनेकदा निर्माण झाले वाद!

याआधी देखील तलवारीमुळे अनेकदा वाद निर्माण झाल्याचे प्रसंग घडले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देखील पाडवा मेळाव्यात अशा प्रकारे तलवार भेट दिल्यानंतर त्यांनी ती हवेत उंचावून दाखवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे अशाच प्रकारे तलवार घेतलेले फोटो एकत्र केलेला एक व्हिडीओ ट्वीट करत “उद्धवा अजब तुझे सरकार” अशी कॅप्शन दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar stops gurujyot singh pulling out sword in joins ncp pmw