scorecardresearch

Video: “मी नखाला नख घासलं, पण माझे केस…”, अजित पवारांनी रामदेव बाबांचा किस्सा सांगताच सभेत हशा पिकला

योगगुरु बाबा रामदेव यांचे नाव घेत अजित पवार यांनी लांब केस करण्यासाठीचा उपाय सांगितला. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला.

Ajit Pawar on Ramdev baba
अजित पवार यांनी बाबा रामदेव यांच्यावर केलेल्या विनोदानंतर सभेत हशा पिकला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखादं वक्तव्य करताना ते ठामपणे करतात किंवा त्याच्या परिणामांची चिंता करत नाहीत. जाहीर सभांमध्ये तर ते असे काही विनोदी वक्तव्य करतात, ज्यामुळे अनेकदा सभेत उपस्थित लोकांची हसून हसून पुरे वाट होते. आज अहमदनगर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी बुवाबाजीवर असेच एक बिनधास्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे उपस्थित सर्वांनाच हसू अनावर झाले. लांब केस हे सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. अजित पवार यांनी अनेकदा स्वतःच्या केसांवर विनोद केलेला आहे. यावेळी त्यांनी रामदेव बाबांचे नाव घेत पुन्हा एकदा विनोद केला.

अजित पवार म्हणाले, त्या रामदेव बाबाचे ऐकून

“तुम्ही नखाला नख कशाला घासता, ते रामदेव बाबाने सांगितले म्हणून करता. रामदेव बाबाने सांगितले नखाला नख घास. मी केलं पण माझी सर्व केसं गेली. नवीन केस यायचं तर नावाच नाही. या बुवा लोकांचं काही ऐकू नका. साधू संताचं ऐका, महापुरुषांचं ऐका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांनी सांगितलेले विचार ऐका. मौलाना आझाद असतील शाहू-फुले-आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महान लोकांचे ऐका. पण बुवाबाजी करणाऱ्यांचे ऐकू नका. नखाला नख घासून तिसरंच काहीतरी व्हायचं. डॉक्टरकडं जावं लागेल. डॉक्टर म्हणेल, हे कुणी करायला लावलं. पुन्हा डॉक्टरचा खर्च करावा लागेल.”, अजित पवारांनी हा किस्सा सभेत सांगताच कुणालाच हसू आवरले नाही.

शरद पवार यांनीही इंदोरीकरांना महाराजांना दिला इशारा

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील काल पुणे येथे बोलत असताना इंदोरीकर महाराज यांचा उल्लेख केला होता. ज्यामुळे उपस्थित लोकांमध्ये हशा पिकला. ते म्हणाले, “एक जण माणसात सहजपणानं चांगले संस्कार कसे करता येईल, हे चांगलं काम निवृत्ती महाराज करतात. त्याचबरोबर, आज मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण, मी त्याचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही, मी एवढाच इशारा त्यांना देऊ इच्छितो”, असे शरद पवार यांनी म्हणताच कार्यक्रमात उपस्थित लोक पोट धरून हसू लागले.

बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

राजस्थान पोलिसांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात रविवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस स्थानकात एका स्थानिक नागरिकाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. रामदेव बाबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करताना मुस्लीम धर्मीयांबद्दल केलेलं विधान वादात सापडलं होतं. या वक्तव्यावरुन भादंविच्या कलम १५३ अ, २९५ अ आणि २९८ अंतर्गत धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 15:28 IST
ताज्या बातम्या