लोकसभा निवडणूक निकालानंतर आता राज्यसभेची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली. तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद न मिळाल्याने काही चर्चा सुरु होत्या. मात्र आम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळेल असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसंच राज्यसभेला खासदार म्हणून अजित पवार सुनेत्रा पवारांना पाठवणार की छगन भुजबळांना याचीही चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका

अशात सुनील तटकरेंनी याबाबत आम्ही लवकरच माहिती देऊ असं म्हटलं आहे. तसंच पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षावरही जोरदार टीका केली. लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं असा आरोप केला आहे. या निवडणुकीत जे काही अनुभवलं त्याचा विचार आम्ही करणार आहोत. काही लोक आमच्या आमदारांच्या संदर्भात संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र तसं काहीही नाही. लवकरच राज्यव्यापी दौरा आम्ही करणार आहोत. अर्थसंकल्प संपल्यानंतर अजित पवारांचाही राज्यव्यापी दौरा होणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यातील भाषणावरुन जयंत पाटील व पक्षातील काही नेत्यांमध्ये वाद असल्याचे तटकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादीत हे शीतयुद्ध नसून हे उघडउघड दिसत असल्याचंही ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषेत सत्य सांगितलं, बोलण्याच्या ओघात ते सत्य बोलून गेले. जयंत पाटील हे सहा वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना काल सांगावं लागलं की मी आता सहा महिने अध्यक्ष आहे, तोपर्यंत काही बोलू नका, याचा अर्थ काय? असा सवाल सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला. तसेच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलबेल नसल्याचंही म्हटलं. जित पवार यांना टार्गेट करण्यात आलं, जाणीवपूर्वक त्यांना सोशल मीडियातून लक्ष्य केलं गेलं, असे म्हणत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांवर निशाणा साधला.

हे पण वाचा- महेश लांडगे, आश्विनी लक्ष्मण जगतापांच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा; महायुतीत तिढा?

जुलै २०२३ या महिन्यात अजित पवार महायुतीत

जुलै २०२३ या महिन्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या ४२ आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. त्यांनी थेट त्यांचे राजकीय गुरु आणि काका शरद पवार यांनाच आव्हान दिलं. शरद पवारांचं वय झालं आहे त्यांनी आता आराम करावा, आम्हाला मार्गदर्शन करावं असं अजित पवार म्हणाले होते. लोकसभा निवडणूक आली तेव्हा महायुतीने बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीने सुप्रिया सुळेंना. शरद पवारांच्या घरात फूट पडल्याचं स्पष्ट चित्र बारामती लोकसभा मतदार संघात पाहण्यास मिळालं. मात्र बारामतीने कौल दिला तो सुप्रिया सुळेंना. अजित पवारांच्या पक्षाचे फक्त सुनील तटकरे निवडून आले आहेत. अशात आता अजित पवारांना निवडणुकीच्या वेळी जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आल्याचा आरोप खासदार सुनील तटकरेंनी केला आहे.