राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बिनधास्त बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. अधून-मधून राजकीय कोट्या करणारा त्यांच्या मिश्किल स्वभाव सर्वश्रुत आहे. मात्र, तितक्याच बिनधास्तपणे अजित पवार हे राजकीय विरोधकांवर देखील टीका करतात. त्यांच्या याच स्वभावाचा परिचय त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या बीड दौऱ्यामध्ये देखील आला. या दौऱ्यामध्ये अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये बीडमधील साखर कारखानदारीवरून जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला. त्याचवेळी अजित पवार यांनी बीडमधील पायाभूत सुविधांवरून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला.

“बीड आलं आणि रस्ता दोनपदरी झाला”

बीडमध्ये झालेल्या एका सभेत बोलताना अजित पवार यांनी बीडमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर निशाणा साधला. “आम्ही लातूरवरून निघालो. लातूरच्या सीमेपर्यंत चारपदरी रस्ता. पण बीड आल्यावर रस्ता झाला दोन पदरी. मी धनंजयला (मुंडे) म्हटलं काय आहे हे? तो म्हणाला दादा आम्ही ८ तास उपोषण केलं. ओरडत होतो. पण त्या वेळच्या नेतृत्वानं इथे लक्षच दिलं नाही. इकडं रस्ता दोन पदरीच राहिला, तिथे चार पदरी झाला”, असं अजित पवार म्हणाले.

“नेतृत्वानं भांडून पैसा आणायचा असतो”

“त्या भागातल्या नेतृत्वानं भांडून पैसा आणायचा असतो. त्यांनी त्या वेळी करायला हवं होतं. इथपर्यंतच का? लातूरपर्यंत रस्ता आणि बीडनं काय घोडं मारलंय का? शेवटपर्यंत चारपदरी रस्ता व्हायला हवा होता. आता राहिलं ना काम अर्धवट”, असं देखील अजित पवार म्हणाले.

“जनतेनं विचारपूर्वक उमेदवार निवडावेत”

“हे राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे. नितीन गडकरींच्या खात्याचं काम आहे. मग खासदार काय करतात? खासदारांचं हे काम नव्हतं का? बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे, मुद्दे मांडले पाहिजेत. लोकप्रतिनिधी कमी पडला, तर ही अवस्था होते. त्यामुळे इथून पुढच्या काळात विचारपूर्वक उमेदवारांना निवडून देण्याचं काम जनतेनं करावं”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

Video : अजित पवार विरुद्ध पंकजा मुंडे… साखर कारखान्यांवरून बीडमध्ये रंगला तुफान कलगीतुरा!

पंकजा मुंडेंचं खोचक प्रत्युत्तर!

दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेला त्याच दिवशी केजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मला कळलं की अजित पवारांनी टीका केली. लातूरमधला रस्ता बर्दापूरमध्येच का थांबला? तो बीडमध्ये का गेला नाही? खासदारांनी असं का केलं? मला त्यांना सांगायचं आहे की आपण अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे. या खासदारांनी ११ राष्ट्रीय महामार्गांचं जाळं तयार करून त्याची एक वरमाला करून बीड जिल्ह्याच्या गळ्यात घातली आहे. ज्या भागात तुम्ही २५-३० वर्ष नेतृत्व केलं, तिथले देखील राष्ट्रीय महामार्ग आमचंच सरकार आल्यानंतर झाले आहेत, एवढं आम्ही काम केलं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.