राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्यात न आल्यास त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू, अशी भूमिका ठाण्यातील सभेत घेतल्यापासून त्यावर मोठं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. हे भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम देखील दिला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या ३ मेपर्यंतच्या अल्टिमेटमवरूनही अजित पवारांनी टीका केली आहे.

“लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न”

“भारत खंडप्राय देश आहे. सगळे वर्षानुवर्ष गुण्यागोविंदाने राहात आहेत. शिवाजी महाराजांपासून तीच शिकवण चालत आलेली आहे. शाहु-फुले-आंबेडकरांनी आपल्याला तेच शिकवलं आहे. काही वेगळ्या पद्धतीची लोकं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हा निव्वळ त्यांचा स्वार्थ आहे. राजकीय फायदा घेण्यासाठी हे सगळं चाललं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मनसेला मोठा झटका, मुंबई आणि मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिला राजीनामा!

“इतकी वर्ष या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण तेव्हा कुणी फार काही बोललं नाही. पण आता मात्र कुणी सांगतं की इतक्या तारखेपर्यंत असं नाही झालं तर ह्यांव करू, त्यांव करू.. असं नाही चालत. संविधानाने जे काही सांगितलं आहे, त्या संविधानाचा आदर आपण केला पाहिजे. त्यातच भारताचं यश अवलंबून आहे. एकमेकांमध्ये दुही माजवून विकासाला खीळ घालणं आपल्या कुणालाही परवडणारं नाही. असं कुणी करू पाहात असेल, तर भावी पिढी हे कदापि सहन करणार नाही हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे”, असं देखील ते म्हणाले.

ST Workers Protest : अजित पवार म्हणतात, “आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना सांगायचो, बाबांनो, तुम्ही सगळे…”!

“…तर ते महाराष्ट्राला भूषणावह नाही”

“त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश द्यावा. कारण नसताना आज असलेल्या एकोप्याला धक्का लावण्याचं कारण काय? त्यातून आपण काय साध्य करणार आहोत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात अशा काही घटना घडल्या, त्यांची किंमत गोरगरीब माणसाला सर्वात आधी मोजावी लागते. मोठ्या माणसांना त्याचा एवढा फटका बसत नाही. त्यातून आपण काय साध्य करतो, हे आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की अशी प्रवृत्ती जर डोकं वर काढू पाहात असेल, तर ते भारताला आणि महाराष्ट्राला भूषणावह नाही”, अशा शब्दांत अजित पवारांनी निशाणा साधला.