रत्नागरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारात सहभागी होण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणे मौन बाळगण्याची भूमिका घेतल्यामुळे गोंधळाचे वातावरण कायम आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत्या गुरुवारी (३ एप्रिल) खेड-गुहागर भागात प्रचार दौऱ्यावर येत आहेत. त्या वेळी या पदाधिकाऱ्यांशी त्यांची थेट चर्चा होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वाचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वेंगुर्ले व सावंतवाडी नगर परिषदा आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडण्याच्या कारवाया जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी गेल्या वर्षी केल्या. त्यामुळे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे, अन्य पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर चिडलेले आहेत. राणेंच्या फोडाफोडीच्या राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून त्यांचे चिरंजीव नीलेश यांच्या निवडणूक प्रचारापासून दूर राहण्याची निर्णय या मंडळींनी घेतला आहे. त्याबाबत ते ठाम असल्याचे लक्षात आल्यानंतर राणे यांनी, काँग्रेस आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्याची आणि त्यातूनही या कार्यकर्त्यांचे सहकार्य न मिळाल्यास राज्याच्या अन्य भागांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून सहकार्य देण्याबाबत विचार करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार काल मुंबईत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत सिंधुदुर्गसह राज्याच्या निरनिराळ्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना अपेक्षित सहकार्य करत नसल्याची तक्रार दोन्ही बाजूंनी झाली. त्याबाबत दोन्ही बाजूंच्या पक्षश्रेष्ठींनी आपापल्या कार्यकर्त्यांना तसे न करण्याबद्दल ताकीद देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री पवार यांनी तशी हमी काँग्रेसच्या नेत्यांना दिली. मात्र प्रत्यक्षात त्याची परिणामकारक कार्यवाही झालेली दिसून येत नाही.  
या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांच्याशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करूनही होऊ शकला नाही. तसेच अन्य स्थानिक पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगणेच पसंत केले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात काँग्रेस आघाडीच्या संयुक्त प्रचाराबाबत गोंधळाचे वातावरण आहे.
राणे पिता-पुत्रांकडून कमालीचे दुखावले गेलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही या प्रकरणी उदासीनतेची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा हे शेजारच्या रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी येत्या गुरुवारी खेड-गुहागर दौऱ्यावर येणार आहेत. पण याच मतदारसंघाला लागून असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघापासून दूर राहणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गचे आमदार केसरकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी खास गुहागरला जाऊन त्यांची भेट घेतली तरच ही कोंडी फुटण्याच्या दिशेने काही परिणामकारक हालचाली होऊ शकतील, अन्यथा राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठीही याबाबत गंभीर नसल्याचे उघड होणार आहे.