scorecardresearch

“अरे शहाण्या तू…”; अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना फटकारलं

आमदार रोहित पवार यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमी कामाचा धडाका सुरू केला आहे

“अरे शहाण्या तू…”; अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना फटकारलं

करोना काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मास्क आणि इतर काळजी घेण्यासाठी नेहमी सतर्क असतात. काल (शनिवार) कर्जत-जामखेड दौऱ्यावर गेल्यानंतर तिकडे कोणीही मास्क वापरत नसल्याचे अजित पवारांना दिसले. जे लोक मास्क वापरत नाहीत ते बरोबर नाही जर तीसरी लाट आली तर मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. यावेळी बोलतांना त्यांनी थेट आमदार रोहित पवार यांना फटकारलं आहे. 

“करोनाचा सामना करण्यासाठी मास्क वापरण आवश्यक आहे. कर्जत जामखेडला अनेकजण मास्कचं वापरत नव्हते. रोहितचं मास्क वापरत नव्हता. मी त्याला सांगितलं, अरे शहाण्या तू आमदार आहेस. तू आधी मास्क वापर. त्यानंतर मला बाकीच्यांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही आणि तुम्ही मास्क वापरत नाही. हे बरोबर नाही.”, असे अजित पवार म्हणाले. 

“मी पण अनेक वर्षे काम केले आहे, पण तत्वतः म्हणजे काय?”; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

अजित पवारांचा फडणवीसांना टोला

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमी कामाचा धडाका सुरू केला आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे २३० कोटी रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत. या कामांचे भूमिपूजन शनिवारी पार पडले आहे. कर्जत-जामखेडमधील विविध विकास कामांचा अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि दत्तामामा भरणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

“काही लोकांनी निवडणुका समोर ठेवून काही तरी थातुरमातुर सांगण्याचा प्रयत्न केला. जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. पिण्याचे पाणी जास्त दाबाने मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आणि मी प्रयत्न केला. रोहित पवार यांनी पाठपुरावा केली आणि आता आपण ही योजना मार्गी लावली आहे. मागे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना त्यावेळचे मुख्यमंत्री इथे आले होते. त्यांनी एक कागद दाखवला आणि सांगितले तत्वतः तुमची योजना मंजूर केली आहे. तत्वतः म्हणजे काय? एकदा योजना मंजुर तरी करायला हवी किंवा मंजुर करणार आहोत असे सांगितले पाहिजे. मी पण अनेक वर्षे काम करत आहे. पण तत्वतः म्हणजे काय? काहीतरी लोकांची दिशाभूल करुन वेळ मारून न्यायचे काम केले,” असे अजित पवार यांनी म्हटले.

यावेळी अजित पवार यांनी कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. आम्ही आमदारांचा निधी चार कोटी केला. मात्र केंद्राने खासदारांचा निधी बंद केला होता. आधीच्या आमदारांच्या कामाचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे केलेले काम अडचणीत येत होते. आज रोहित पवार प्रयत्न करत आहे,” असे अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 15:17 IST

संबंधित बातम्या