Ajit Pawar Bombardier Learjet 45 Safety Report: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ हे खासगी व्यावसायिक विमान बुधवारी बारामती येथे कोसळले. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान व्हिएसआर व्हेचंर्स प्रा. लि. कंपनीकडून चालवले जात होते. तर अपघातग्रस्त विमान VT-SSK या नावाने नोंदणी केलेले होते. अपघात इतका भीषण होता की, विमानातील कुणीही वाचू शकलेले नाही.

विमान कसे होते?

लिअरजेट ४५ या विमानात दोन इंजिने होती. व्हीआयपी आणि कॉर्पोरेटसाठी हे विमान वापरले जाते. छोटेखानी असलेले हे विमान वेगाने प्रवास करण्यासाठी वापरले जाते. कॉर्पोरेट क्षेत्रातील धुरीण, राजकारणी, चित्रपट अभिनेते-अभिनेत्री ही मंडळी या विमानाचा वापर करत असत. गंतव्यस्थळी कमीत कमी वेळेत नेत असल्यामुळे या विमानाला पसंती दिली जात असे. बारामती सारख्या छोट्या आणि प्रादेशिक विमानतळांवर याचा प्रवास होत होता.

कंपनीने काय म्हटले?

व्हीएसआर व्हेचंर्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर विमानाला कोणतीही समस्या नव्हती. इंडिया टुडेशी बोलताना व्हीएसआरचे अधिकारी विजय कुमार सिंह अधिकारी म्हणाले, सदर विमान १०० टक्के सुरक्षित होते. तसेच विमानाचा क्रू बऱ्यापैकी अनुभवी होता. अपघातासाठी कदाचित कमी दृश्यमानता कारणीभूत असू शकेल. तरीही डिजीसीएच्या चौकशीतून खरे कारण समोर येईल.

पायलट कोण होते?

विजय कुमार सिंह पुढे म्हणाले, या अपघातात दोन्ही पायलट सुमीत कपूर आणि संभवी पाठक यांचा मृत्यू झाला आहे. आम्ही आमच्या दोन्ही पायलटला गमावले असून सर्व प्रवाशीही मृत्यूमुखी पडले आहेत.

व्हीएसआर व्हेचंर्स प्रा. लि. ही नवी दिल्लीस्थित कंपनी आहे. जिची स्थापना २०११ साली झाली होती. विजय कुमार सिंह आणि रोहित सिंह यांच्याकडून सदर कंपनी चालवली जाते. व्यावसायिक प्रवासाची सेवा देण्यासाठी या कंपनीकडून विमान पुरवले जातात.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार व्हीएसआर कंपनीला १५ वर्षांहून अधिक काळ विमान चालविण्याचा अनुभव आहे. कंपनीकडे ६० वैमानिक आहेत आणि हवाई प्रवाशांनी ९९ टक्के समाधान व्यक्त केल्याचा कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.